मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री क्रांती रेडकरने २०१७ मध्ये सरकारी अधिकारी समीर वानखेडेंशी लग्न केलं. क्रांती व समीर दोघेही एकमेकांना कॉलेजच्या दिवसांपासून म्हणजेच साधारण १९९७ पासून ओळखत होते. या दोघांचीही जोडी कायम चर्चेत असते. अनेक कठीण प्रसंगांमध्ये क्रांती आपल्या नवऱ्याला खंबीरपणे साथ देताना दिसते. या जोडप्याला झिया आणि झायदा अशा दोन जुळ्या मुली आहेत. ३ डिसेंबर २०१८ रोजी अभिनेत्रीने या जुळ्या मुलींना जन्म दिला. आज लाडक्या मुलींच्या वाढदिवसानिमित्त क्रांतीने खास पोस्ट शेअर करत या दोघींना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
क्रांती झिया-झायदाला प्रेमाने छबील आणि गोदो अशी हाक मारते. त्यांच्या जन्मानंतरचा एक खास फोटो शेअर करत अभिनेत्री लिहिते, “छबील-गोदो आज तुम्हाला ५ वर्ष पूर्ण झाली! तुम्ही मला एवढा आनंद दिलात की, एवढी वर्षे कशी निघून गेली मला समजलंच नाही. तुमच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण आजही माझ्या लक्षात आहे. तुमचं गोड हास्य, रात्री न मिळालेली झोप ते तुमचे घाणेरडे डायपर बदलण्यापर्यंत अगदी सगळं काही माझ्या कायम लक्षात राहील. तुम्हा दोघींची एक मिठी सुद्धा मला पुरेशी आहे. कधीतरी वाटतं माझ्यापेक्षा तुम्ही दोघी माझ्यावर जास्त प्रेम करता का?”
“तुमच्या आईप्रमाणे तुम्ही दोघी कायम हसतखेळत, आनंदी राहा. भौतिक सुखामागे पळण्याआधी तुम्ही दोघीही उत्तम आणि दयाळू माणूस व्हा. माझ्या बाळांनो, आणखी काही वर्षांनी तुमच्या आईने केलेली ही पोस्ट तुम्ही वाचाल अशी मला खात्री आहे. तुमच्या आईकडून तुम्हाला खूप खूप प्रेम!” असा गोड सल्ला क्रांतीने या पोस्टमधून आपल्या दोन्ही मुलींना दिला आहे.
हेही वाचा : मृण्मयी देशपांडेच्या संसाराला ७ वर्षे पूर्ण! नवऱ्याबरोबर लिपलॉक करतानाचा फोटो शेअर करत म्हणाली…
दरम्यान, झिया-झायदावर वाढदिवसानिमित्त सिनेविश्वातील कलाकार तसेच क्रांतीच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्रीने या दोघींना सोशल मीडियापासून दूर ठेवलं आहे. त्यांचा चेहरा न दाखवता अभिनेत्री त्यांचे अनेक व्हिडीओ आणि किस्से सोशल मीडियावर शेअर करत असते.