Kranti Redkar : मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री व दिग्दर्शिका म्हणून क्रांती रेडकरला ओळखलं जातं. ‘कोंबडी पळाली’ या गाण्याचं नाव जरी घेतलं तरी डोळ्यासमोर क्रांतीचा चेहरा येतो. सध्या अभिनेत्री आपल्या करिअरसह घरची जबाबदारी सुद्धा सक्षमपणे सांभाळत आहे. प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्रीने वैयक्तिक आयुष्यात २०१७ मध्ये समीर वानखेडे यांच्याशी लग्न करून वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली. क्रांती नेहमीच नवऱ्याला खंबीरपणे साथ देताना दिसते. दोघेही एकमेकांना १९९७ पासून ओळखतात. क्रांती आणि समीर यांचं पदवी शिक्षण एकाच महाविद्यालयात झालं होतं.
समीर आणि क्रांती यांच्या लग्नाला आज ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने क्रांती रेडकरने खास पोस्ट शेअर करत पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्रीने या पोस्टबरोबर त्यांच्या लग्न सोहळ्यातील काही फोटो देखील शेअर केले आहेत.
हेही वाचा : सागर जुन्या मुक्ताला मिस करतोय का? ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील रिप्लेसमेंटवर स्वरदा ठिगळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…
क्रांती रेडकरची खास पोस्ट
क्रांती लिहिते, “८ वर्षांपूर्वी या प्रवासाची सुरुवात झाली…आणि आता आपण कायम एकत्र असणार आहोत. फक्त याच नव्हे तर प्रत्येक जन्मी जोडीदार म्हणून मला तुमची साथ मिळावी. २७ वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला वर्गात पाहिलं तेव्हा वाटलं, अरे मी तुम्हाला ओळखते पण, माझ्या मुलींचा बाबा फक्त आपल्यापासून ४ बेंच दूर बसलाय हे मला कधीच कळलं नाही. आता आपण खूप पुढे आलो आहोत. या प्रवासात अनेक चढउतार अनुभवले. आता या प्रवासात तुम्ही माझी आणि मी तुमची एक शक्ती आहे. असेच कायम आनंदी राहा…तुम्ही खऱ्या अर्थाने वेगळे आहात. माझ्या आयुष्यात तुम्ही आहात हे माझं भाग्यच आहे. थँक्यू छबील आणि गोदो…तुम्हा दोघींनाही खूप प्रेम”
क्रांती आणि समीर वानखेडे यांनी रुईया महाविद्यालयात एकत्र पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे. मात्र, त्यावेळी दोघांची भांडणं व्हायची. यानंतर या भांडणांचं रुपांतर तब्बल १० वर्षांनी मैत्रीमध्ये झालं. एकमेकांशी मैत्री झाल्यावर पुढे, जवळपास ५ ते ६ वर्ष एकमेकांच्या संपर्कात राहिल्यावर दोघांनीही २०१७ मध्ये लग्न केलं. या जोडप्याला झिया आणि जायदा नावाच्या दोन जुळ्या मुली आहेत. यांची टोपणनावं अभिनेत्रीने छबील आणि गोदो अशी ठेवली आहेत. क्रांती या दोघींचा चेहरा न दाखवता त्यांचे अनेक व्हिडीओ आणि किस्से सोशल मीडियावर शेअर करत असते.
© IE Online Media Services (P) Ltd