क्रांती रेडकर व सरकारी अधिकारी समीर वानखेडे यांची जोडी नेहमीच चर्चेत असते. हे दोघेही एकमेकांना कॉलेजच्या दिवसांपासून ओळखत होते. कालांतराने त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन अभिनेत्रीने २०१७ मध्ये समीर वानखेडेंशी लग्न केलं. या जोडप्याला आता झिया आणि झायदा अशा दोन जुळ्या मुली आहेत. क्रांती तिच्या मुलींचे मजेशीर व्हिडीओ आणि धमाल किस्से सोशल मीडियावर त्यांचा चेहरा न दाखवता शेअर करत असते. या दोघींना अभिनेत्री प्रेमाने छबील आणि गोदो अशी हाक मारते.
क्रांतीने नुकताच शेअर केलेला या दोघींचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. मराठी कलाकारांसह नेटकरी या मुलींच्या संस्कारांचं भरभरून कौतुक करत आहेत. क्रांतीने शेअर केलेला व्हिडीओ नेमका काय आहे जाणून घेऊयात…
क्रांती रेडकर तिच्या मुलींचा व्हिडीओ शेअर करत म्हणते, “आमच्या घरी छबील आणि गोदोचे मित्र-मैत्रिणी शनिवारी खेळायला येणार आहेत आणि ही मुलं श्रीकृष्ण-गोविंद हा सुंदर खेळ खेळणार आहेत. श्रीकृष्ण-गोविंद म्हणजे श्रीकृष्णाचा जन्म ही मुलं रिक्रिएट करणार आहेत. यांच्यातील एक मुलगी यशोदा, एक देवकी, वासुदेव, एक नंद बनेल… यानंतर कृष्णजन्म होईल. पुढे बाळकृष्णाचं संगोपन माता यशोदा करेल. असं संपूर्ण नियोजन या मुलांनी करून ठेवलेलं आहे.” आपल्या आईच्या मागे या व्हिडीओत छबील देखील श्रीकृष्ण जन्माची संपूर्ण कथा सांगत होती.
हेही वाचा : “बायकोने ५ लाखांची FD मोडली अन्…”, अंशुमन विचारेने ‘असं’ घेतलं हक्काचं घर; म्हणाला, “बँकेचा हफ्ता…”
“शनिवारी छबील देवकी, तर गोदो यशोदा बनेल. यांच्याबरोबर या दोघींच्या सगळ्या मैत्रिणी सहभागी होतील. या दोघींमुळे आमच्या घराचं सुंदर असं नंदनवन तयार झालंय.” असं क्रांती रेडकरने या व्हिडीओमध्ये सांगितलं. याशिवाय या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये क्रांती लिहिते, “आमच्या घरी शनिवारी माझ्या मुली श्रीकृष्णजन्म साकारणार आहेत. आपल्या मुलांना या जुन्या गोष्टी व कथा समजावून सांगणं आजच्या काळात खूप महत्त्वाचं आहे. आपल्या भारतमातेच्या संस्कृतीची त्यांना ओळख करून दिली पाहिजे. यामुळे भविष्यात खरा मार्गदर्शक शोधण्यात त्यांना मदत होईल.”
दरम्यान, क्रांतीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. सगळ्यांनी अभिनेत्रीच्या दोन्ही मुलींचं भरभरून कौतुक केलं आहे. “मॅडम, त्यांच्या श्रीकृष्ण-गोविंद खेळाचा संपूर्ण व्हिडीओ काढून आम्हाला दाखवा”, “आताच्या काळातल्या मुलांच्या तोंडून असे विषय ऐकणं नवलंच असा विषय सुचणं पण किती कठीण आहे”, “खूप सुंदर…” अशा विविध कमेंट्स चाहत्यांनी क्रांतीच्या व्हिडीओवर केल्या आहेत.