आज कृष्णाष्टमी. विष्णूचा आठवा अवतार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगवान कृष्णाचा जन्मदिवस म्हणून कृष्णाष्टमी सण साजरा केला जातो. हा सण देशातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात उत्साहाने साजरा केला जातो. या कृष्णाष्टमीचं एक खास नातं मनोरंजनसृष्टीतील महान विनोदवीर म्हणजेच दादासाहेब खंडेराव कोंडके यांच्याशी आहे. हे नेमकं नातं काय आहे? आणि दादासाहेब हे नाव त्यांना कसं पडलं? हे आज आपण कृष्णाष्टमीच्या औचित्यानं जाणून घेऊ या. अनिता पाध्ये यांनी शब्दांकन केलेल्या दादा कोंडके यांच्या आत्मचरित्रात या प्रसंगाबद्दलचं सविस्तर वर्णन आहे.
मराठी मनोरंजनसृष्टीत अनेक इतिहास रचणारे, नाटक असो किंवा चित्रपट एकापेक्षा एक सरस काम करणारे, गिनीज बुकात नाव नोंदवणारे, सलग नऊ चित्रपट रौप्यमहोत्सवी करून दाखविणारे विनोदी अभिनेते, द्व्यर्थी गीत-संवाद लेखक, दिग्दर्शक, निर्माता अशा भूमिका यशस्वीरीत्या पार पाडणारे एकमेव म्हणजे दादा कोंडके. मुंबईतल्या वाडिया हॉस्पिटलमध्ये १९२८ साली दादा कोंडके यांचा जन्म झाला. या दिवशी कृष्णाष्टमी होती. जन्माला येताच दादा अशक्त असल्यामुळे त्यांना काचेच्या पेटीत ठेवलं गेलं होतं.
वडील खंडेराव कोंडके यांनी दादा जगतील याची आशाच सोडून दिली होती. सर्व जण सात दिवस चिंतेत होते. आठव्या दिवशी दादांना बघण्यासाठी त्यांचे मामा घरी आले. यावेळी दादांचे वडील व काका घरी नव्हते. ते कामावर गेले होते. त्यामुळे त्यांच्या जेवणाचा डबा घेण्यासाठी जो माणूस आला, त्याच्याकडून दादांच्या चुलतीनं वडील खंडेराव कोंडके यांना निरोप धाडला; पण तो निरोप दादांच्या वडिलांपर्यंत चुकीचा पोहोचला.
‘संध्याकाळी जरा लवकर या; मामा आला आहे’, असा निरोप दादांच्या चुलतीनं त्या माणसाला दिला होता. पण त्या माणसानं मशीनचा आवाज खूप असल्यामुळे घरी बोलावलं आहे एवढाच निरोप दिला. त्यामुळे दादांच्या वडिलांना वाटलं की, दादा गेल्यामुळे घरी बोलावलं आहे. म्हणून तातडीनं त्यांनी शिट्टी मारून सगळं काम थांबवलं.
त्यानंतर दादांच्या वडिलांनी ही गोष्ट चुलत्यांना जाऊन सांगितली. दोघांनी दुपारी १ वाजता घराऐवजी थेट हॉस्पिटलच गाठलं. मास्तरांचा मुलगा गेला ही बातमी सगळीकडे पसरली. त्यामुळे दादांना पोहोचवण्यासाठी त्या काळात जवळपास २५०-३०० माणसं हॉस्पिटलच्या खाली जमली. हे पाहून नर्सला कळेना. यामधल्या एकाही व्यक्तीनं दादांबद्दल चौकशी केली नाही. जन्मल्यापासून सतत दादा आजारी असल्यामुळे ते जाणार हे सर्वांनी गृहीत धरलं होतं. दुपारी ४ वाजता पेशंटला बघण्याची वेळ असते. त्यामुळे यादरम्यान फक्त दादांच्या वडिलांनाच वॉर्डमध्ये सोडण्यात आलं. त्यावेळी खंडेराव कोंडके दादांच्या आईजवळ जाऊन बसले आणि त्यांना ‘काय झालं?’, असं विचारलं. दादांचे वडील हळू आवाजात बोलल्यामुळे दादांच्या आईंना काही ऐकू गेलं नाही.
जेव्हा मेट्रन ४ वाजता आली तेव्हा दादांच्या चुलत्यांनी जाऊन तिच्याकडे चौकशी केली. ‘आमचं पोरगं कधी गेलं?’ असं त्यांनी मेट्रनला विचारलं. तिला काही कळेना. ‘पोरगं गेलं म्हणजे काय ते?’ मग पुन्हा दादांचे चुलते म्हणाले, ‘आमचं पोरगं गेलं ना?’ मेट्रन म्हणाली, ‘तुम्हाला कोणी सांगितलं.’ तेव्हा दादांचे चुलते घाबरले. ज्या माणसानं हा निरोप दिला होता, त्या माणसाला बोलावून घेतलं. त्याची चौकशी केली. ‘घरी का बोलावलं होतं?,’ असं दादांच्या चुलत्यांनी त्या माणसाला विचारलं. तो म्हणाला, ‘मला काय माहीत?’ घरी बोलावलंय एवढाच निरोप द्यायला सांगितला होता.
हेही वाचा – “…यामुळे पहिल्याच टेकमध्ये दहीहंडी फोडू शकले”; ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने सांगितला किस्सा
हे कळल्यानंतर हॉस्पिटलमध्ये आलेले सगळे अवाक् झाले आणि आल्या पावली तसेच निघून गेले. दिवसभरात घडलेली ही गोष्ट खंडेराव कोंडके यांनी दादांच्या आईंना सांगितली. तेव्हा तिथे असलेली एक नर्स पटकन म्हणाली, ‘बघा, तुमच्या मुलाला भरपूर आयुष्य आहे.’ दादांचा जन्म कृष्णाष्टमीचा असल्यामुळे त्याचं नाव ‘कृष्णा’ ठेवण्यात आलं होतं; पण दादा सतत आजारी पडायचे. अशक्त असल्यामुळे त्यांचे आजोबा त्यांना वनस्पतीचा कडवट रस पाजायचे. पण दादांच्या आईला कुणीतरी सांगितलं, ‘नावानं हाक मारण्याऐवजी दादासाहेब किंवा रावसाहेब म्हणा.’ तेव्हापासून दादांना ‘दादासाहेब’ म्हणायला सुरुवात झाली.