Rinku Rajguru Krishnaraaj Mahadik Photo : अभिनेत्री रिंकू राजगुरू व भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र कृष्णराज महाडिक यांचा एक फोटो दोन दिवसांपासून चर्चेत आहे. कृष्णराज यांनी रिंकूबरोबर कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिराबाहेर काढलेला फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. त्यानंतर या दोघांबद्दल खूप चर्चा रंगल्या होत्या. आता कृष्णराज यांनी स्वतः याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
रिंकू व कृष्णराज यांचा हा फोटो समोर आल्यानंतर या दोघांचं ठरलंय, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र हे सगळं खोटं आहे, असं कृष्णराज यांनी स्पष्ट केलं आहे. “काल सकाळपासून काही खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. सगळ्यांना विनंती आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका आणि त्यांना कृपया पुढे पसरवू नका,” असं कृष्णराज यांनी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं आहे.
कृपया गैरसमज करू नका – कृष्णराज महाडिक
कृष्णराज यांनी रिंकूबरोबर मैत्री असून ठरवून फोटो काढल्याचं सांगितलं. “फोटोमुळे गैरसमज करू नका. रिंकू माझी फक्त चांगली मैत्रीण आहे. एका कार्यक्रमासाठी ती कोल्हापूरला आली होती, त्या निमित्ताने आमची भेट झाली, त्यामुळे आम्ही एकत्र महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलो होतो. तिथे एकत्र जो फोटो काढला, तो फोटो माझ्या सोशल टीमने पोस्ट केला. त्यावरून खूप अफवा पसरवल्या जात आहेत. आमच्या दोघांच्याही कुटुंबाला या नात्याबद्दल विचारलं जात आहे, पण तसं काहीच नाही. त्यामुळे कृपया गैरसमज करू नका. आम्ही ठरवूनच भेटलो होतो, पण फोटोचा वेगळा अर्थ काढला जातोय. आम्ही चांगले फ्रेंड्स आहोत, त्यापलीकडे आमच्यात काहीच नाही,” असं कृष्णराज महाडिक म्हणाले.

अभिनेत्री रिंकू राजगुरू सोमवारी कोल्हापुरात ‘राजर्षी शाहू महोत्सवा’साठी गेली होती. त्यानंतर ती कृष्णराज महाडिक यांच्याबरोबर मंदिरात दर्शनाला गेली होती. त्या भेटीदरम्यान त्यांनी फोटो काढला. तोच फोटो कृष्णा महाडिक यांच्या टीमने सोशल मीडियावर शेअर केला. मात्र हा फोटो पाहून त्यावर नेटकऱ्यांनी दोघांच्या नात्याबद्दल कमेंट्स केल्या होत्या. अखेर कृष्णराज यांनीच या फोटोबाबत स्पष्टीकरण देत अफवा न पसरवण्याचं आवाहन केलं आहे.
धनंजय महाडिक यांनी यावर्षी कृष्णराज यांचे लग्न करायचे आहे, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांचा रिंकूबरोबरचा फोटो पाहून लोक विविध प्रकारच्या कमेंट्स करत होते. मात्र, रिंकू फक्त चांगली मैत्रीण असल्याचं कृष्णराज यांनी स्पष्ट केलंय.