अभिनेत्री व निर्माती क्षिती जोग (Kshitee Jog) ही नुकतीच ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या चित्रपटात ती सिद्धार्थ चांदेकर व अमेय वाघ यांच्याबरोबर प्रमुख भूमिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. क्षिती, सिद्धार्थ व अमेय यांनी या चित्रपटात भावंडांची भूमिका साकारली आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. आता एका मुलाखतीत क्षिती जोगने चित्रपट निर्मितीतला सगळ्यात सुखकर जॉब हा कलाकारांचा असतो, असे म्हटले आहे.

तरी त्याच्यामागे खूप लोक मेहनत…

क्षिती जोगने ‘अजब गजब’ या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत चित्रपट निर्मितीनंतर तिचा अनुभव कसा आहे, आता फक्त सेटवर जाऊन अभिनय करायचा नाही, तर सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात, तर ते तू कसं करतेस? याबाबत बोलताना क्षिती जोगने म्हटले की, मी जेव्हा फक्त अभिनेत्री होते, त्यावेळी मला वाटायचं की, सगळ्यात जास्त मेहनत कलाकार करतात. असं वाटायचं की आम्ही किती मेहनत घेतो. सकाळी ९ पासून ते रात्री ९ पर्यंत ते पात्र साकारावे लागते. हे खरं आहे की, कलाकार मेहनत घेतातच; पण चित्रपट निर्मितीतला सगळ्यात सुखकर जॉब हा नटाचा आहे हे मी आज छातीठोकपणे सांगू शकते. कलाकारांना खूप विशेषाधिकार मिळतात. कारण- सगळे त्यांची काळजी घ्यायला असतात. स्पॉट बॉय असतो, जो विचारतो की, तुम्हाला चहा-पाणी पाहिजे का? लाईट बॉय असतो, जो तुमच्या चेहऱ्यावर येणाऱ्या लाईटची काळजी घेतो. कलाकार छान दिसावे, यासाठी सगळे जण मेहनत घेतात. त्याच्यामागे काम करणारी खूप यंत्रणा असते. मला माझी प्रॉडक्शनची टीम चांगली मिळाली. तरी हे सगळं बघताना माझी दमछाक झाली. हेही मलाच करायचं आहे, असं मला वाटायचं. चित्रपटाची शूटिंग सुरू होण्याआधी अमुक अमुक गोष्टी करायच्या आहेत, असं ठरवलं जातं. मात्र, सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतरही काही गोष्टी बघाव्या लागतात.

पुढे क्षिती जोगने म्हटले की, मी अभिनेत्री होते तेव्हा एखादं पोस्टर पाहिल्यावर म्हणायचे की, काय फालतू पोस्टर बनवलं आहे. या लोकांना काही कळतच नाही. आता जेव्हा मी हे सगळं करत आहे तेव्हा मला कळतं की, काही लोकांना आवडत नसलं तरी त्याच्यामागे खूप लोक मेहनत घेतात. हे फालतू आहे, असं म्हणणं सोपं आहे. कारण- पूर्वी माहीतच नव्हतं की, त्याबरोबर कसं डील करायचं आहे. किंवा एका सिनेमा बनवणं हे फक्त निर्मात्याच्या हातात नसतं.

लोक काही वेळेला म्हणतात ना की, आता कशाला चित्रपट रिलीज केला? त्याच्या मागे खूप कारणं असतात. एक असं की, त्या तारखेनंतर कलाकारांच्या तारखा मिळत नाहीत. मग चित्रपटाचं प्रमोशन कसं होणार? दुसरं असं की, जर चित्रपट निर्मितीसाठी कुठून तरी पैसे घेतले असतील, तर ते पैसे दिलेल्या मुदतीत परत द्यायचे असतील, तर तो सिनेमा रिलीज करावा लागतो. अशी खूप कारणे आहेत. पूर्वी मी या गोष्टी गृहीत धरत नव्हते. आता माझ्या डोक्यात चक्र सुरू राहतं, अशी प्रतिक्रिया क्षिती जोगने व्यक्त केली. एकंदरीत निर्माती झाल्यानंतर गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, असे क्षिती जोगने म्हटले आहे.

Story img Loader