अभिनेत्री व निर्माती म्हणून क्षिती जोगची ओळख आहे. गेल्या काही दिवसांपासून क्षिती तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटाची निर्मिती क्षितीने केली आहे. तसेच या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेतही ती दिसली आहे. तिच्याबरोबर ‘फसक्लास दाभाडे’मध्ये सिद्धार्थ चांदेकर व अमेय वाघदेखील प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. हेमंत ढोमेने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातील भूमिका तिने का करायचे ठरवले, सिनेमा करताना तिला कोणत्या गोष्टींची जाणीव झाली, याबद्दल क्षितीने एका मुलाखतीत वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाली क्षिती जोग?

क्षिती जोगने नुकतीच अमोल परचुरेंच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत क्षितीला तिच्या ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेविषयी विचारले. खऱ्या आयुष्यात भावंडं नाहीयेत, प्रत्यक्षात एकुलती एक आहेस, तर ही भूमिका करण्यामागे हे एक कारण होतं का? यावर बोलताना क्षितीने म्हटले, “मला ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’, ‘सनी’ या चित्रपटांतील रोल खूप जवळचे आणि प्रेमाचे आहेत. पण, असं पात्र एक तर मी कधी केलं नव्हतं. या चित्रपटातील बहीण कटकटी आहे, पण ती तेवढीच प्रेमळ आहे. ती भाषा, असा सेटअप, हे पात्र ग्रेसुद्धा नाही, असं मधलं पात्र आहे. या पात्राविषयी वाचल्यापासून मला फार इच्छा होती, त्यामुळे जेव्हा फायनल स्क्रीप्ट झाली तेव्हा मी हेमंतला म्हटलं की प्लीज मला एकदा वाचू दे. “

“एकतर अशा भाषेत, ग्रामीण सेटअपमध्ये काम केलेलं नाहीये. हा चित्रपट हेमंतच्या गावाला शूट झालाय, त्यामुळे ती भाषा त्या गावातील आहे. एक अभिनेत्री म्हणून मला त्याबद्दल आकर्षण वाटत होतं की ती भाषा आपल्याला बोलता येते का नाही? कारण- सगळ्यांमध्ये आपण वेगळे वाटलो नाही पाहिजे, असं एक होतं. अमेयची त्या भाषेवर पकड आहे. हरीश दुधाडे तो अहमदनगरचा आहे, त्याचीही त्या भाषेवर पकड आहे. बाकी सगळ्यांना जमत होतं. मी, सिद्धार्थ चांदेकर आणि निवेदिता मावशी आम्ही लंगडी गाय होतो, की आम्हाला येईल ना? असं वाटत होतं. पण, आम्ही वाचनंही खूप केली, त्यामुळे ही भूमिका निवडण्यापाठीमागे हे एक कारण होतं.”

पुढे क्षितीने म्हटले, “सिनेमा संपल्यानंतर मला माझ्या भावंडांची फार आठवण आली. कारण मी माझं लहानपण माझ्या मावस भावंडांबरोबर घालवलं आहे. आता कामाच्या व्यापात कधीतरी रक्षाबंधन, लग्न, दिवाळी यानिमित्ताने भेटणं होतं. सिनेमा झाल्यानंतर मला जाणीव झाली की, आपण भावंडांच्या संपर्कातच नाही. व्हॉट्सअप ग्रुपवर गुड मॉर्निंग, आज माझा सिनेमा येतोय, अशा प्रकारच्या बोलण्याला संपर्कात राहणं म्हणत नाहीत. तर मला त्यांची फार आठवण आली. स्क्रीप्ट वाचूनही मला माझ्या मावस भावाची, मोठ्या मावस बहिणीची आठवण आली होती. तर ते मला या स्क्रीप्टमधलं सगळ्यात आकर्षित करणारं होतं. आपण त्या एका नात्याला गृहीत धरतो”, असे म्हणत चित्रपटातील या भूमिकेमुळे भावंडांची आठवण आली, असे क्षितीने म्हटले आहे.

दरम्यान, फसक्लास दाभाडेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता हा चित्रपट किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kshitee jog on her role of fussclass dabhade says after i missed my cousin also shares challenges of her role nsp