अभिनेत्री क्षिती जोग (Kshitee Jog) काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहेत. फसक्लास दाभाडे या चित्रपटाच्या निमित्ताने ती मोठ्या चर्चेत असल्याचे पाहायला मिळाले. हा चित्रपट नुकताच २४ जानेवारीला प्रदर्शित झाला आहे. क्षिती जोग या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. क्षितीबरोबरच सिद्धार्थ चांदेकर व अमेय वाघ हेदेखील महत्त्वाच्या भूमिकांत आहेत. अभिनेत्री असण्याबरोबरच क्षिती निर्मातीसुद्धा आहे. आता एका मुलाखतीत निर्माती म्हणून तिची भूमिका काय असते, विविध कंपन्या, व्यक्तींबरोबर काम करताना तिला काय अनुभव येतो. निर्माती म्हणून ती त्याचा कसा उपयोग करून घेते, जेव्हा ती निर्माती नव्हती तेव्हा ती याबद्दल काय विचार करायची याबद्दल अभिनेत्रीने एका मुलाखतीत वक्तव्य केले आहे.
जेव्हा प्रत्यक्षात सिनेमाचं काम सुरू होतं, तेव्हा…
अभिनेत्री व निर्माती क्षिती जोगने नुकतीच अमोल परचुरेंच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत क्षितीला विचारले की, निर्माती म्हणून तुझं काम कशा प्रकारे असतं? यावर उत्तर देताना क्षिती जोगने म्हटले, “सिनेमाच्या सुरुवातीपासून त्या सिनेमासाठी पैसे आणणे. दर वेळेला एवढे पैसे माझ्याकडे असतीलच, असं नाही. वेगवेगळ्या लोकांना जाऊन भेटणे. तो फायनान्स आणणे, ते त्या बजेटमध्ये बसवणे. आता कंपनीत हेमंत माझ्याबरोबर निर्माता आणि दिग्दर्शकही आहे. पण, जेव्हा प्रत्यक्षात सिनेमाचं काम सुरू होतं, तेव्हा त्याच्यातला दिग्दर्शक जास्त पुढे येतो. तेव्हा त्याला हे समजावून देणं की, हे सगळं बरोबर आहे. पण, आपलं बजेट एवढं आहे. या बजेटमध्ये ते बसवायला पाहिजे. किंवा आता ‘फसक्लास दाभाडे’च्या वेळेला आम्ही नारायणगावला शूट केलंय. तर तिथे काही सोई-सुविधा नव्हत्या. म्हणजे हॉटेल्स नव्हते, जिथे लोकांची राहण्याची सोय करून पुढे काम करता येईल. या सगळ्याचा विचार करणं, आपल्याला काय करता येईल, किती लांब राहावं लागेल, किती जवळ इथपासून ते आता सिनेमा कधी प्रदर्शित करायचा. मग त्याच्यात टी-सीरिज, कलर येलो आता आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत. त्यांच्याशी काय बोलायचं, हे सगळंच करावं लागतं. मला हे माहीत असतं की, कुठे काय चाललं आहे. त्यामुळे अंतिम निर्णय घेणं, लोकांना एखादी गोष्ट पटवून देणं, मीटिंग्स करणं हा माझा या कंपनीत जॉब आहे. या कंपनीत थोडी बॅड कॉप आहे; पण कोणाला तरी व्हायला पाहिजे. कारण- सिनेमाच्या बाबतीत हेमंत फार हळवा होऊन काही निर्णय घ्यायला जातो. तर ते कोणीतरी हे बघायला पाहिजे की, आपल्याला काय पाहिजे, काय नाही. तर चित्रपटाची जुळवाजुळव करेपर्यंत तो रिलीज झाला. त्यानंतरच्या गणितापर्यंत सगळीकडेच बघावं लागतं.”
मोहन वाघ, आनंद एल. राय किंवा आता टी-सीरिज, करण जोहर यांच्याबरोबर तू काम केलंस. या सगळ्यातून तुला काय काय मिळत गेलं? या सगळ्या सिनेमांमध्ये निर्माती म्हणून ते वापरायला मिळालं? यावर बोलताना क्षिती जोगने म्हटले, “मी जेव्हा फक्त अभिनेत्री म्हणून काम करत होते आणि निर्माती झाले नव्हते. तेव्हा मी सरसकट निर्मात्यांना अक्कल नसते, अशी एक लोकांची कॅटेगरी आहे. त्यात मीही होते. कारण- मला असं होतं की, हा निर्माता नीट प्रमोशन करत नाही. अमुक अमुक गोष्ट प्रॉडक्शनने दिली नाही. आता निर्माती झाल्यावर त्या लोकांना किती स्ट्रेस असेल, हे जाणवतं. म्हणजे मोहन वाघ जेव्हा नाटक करायचे. तेव्हा ते रिहर्सलला येताना खायला आणायचे. तेव्हा मी लहानही होते; पण मी तेवढंच बघायचे. आता मला कळतंय की, त्याच्या मागे ते किती मेहनत घेत असतील. त्यांचं डोकं किती खर्ची लागलं असेल. त्यांचे पैसे लागलेले असतात. सगळी सोंगं करता येतात; पैशाची करता येत नाहीत.”
“करण जोहरबरोबर काम करताना, त्यांची कंपनी ते कसे चालवतात. त्यांची कंपनी खूप मोठी आहे. आपण त्या मानानं खूप छोटे आहोत; पण तरीसुद्धा चोरीचा मामला करीत होतो, तोपर्यंत झिम्मा करायचा की नाही आमचं ठरलं नव्हतं. पण त्या काही गोष्टी डोक्यात राहिल्यात. आपली कंपनी कसं चालवतात, हे लोकांशी कसं वागतात. त्यात काही वेळेला असं होतं की, आपण असं वागायचं नाही, काही वेळेला आपण असं वागायचं असं होतं. उदाहरणार्थ- कलर येलोचे सर्वेसर्वा आनंद एल. राय हा माणूस इतका प्रेमळ, चांगला, मृदू भाषी आहे की, अर्ध्या वेळेला त्यांच्या या वागणुकीमुळे काही गोष्टींना कधी कधी मी पटकन हो म्हणून टाकते. मग मला असं होतं की नाही म्हणायचं होतं. पण, यासुद्धा गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. अभिनेत्री म्हणून मी फक्त माझा विचार करत असते. माझं काम, माझी मेकअप रूम, माझा स्टाफ, माझा सीन असा विचार असतो. पण, निर्माती म्हणून प्रत्येकाचा विचार करावा लागतो, त्यामुळे दयाभाव वाढतो. टीमवर्कने काम केलं, तर त्याची फळंही चांगली मिळतात. तर मी ते या सगळ्यांकडून शिकते. हल्ली मी फार निरीक्षण करते आणि मी जास्त विचार करायला लागले आहे”, असे म्हणत निर्माती झाल्यानंतर गोष्टींकडे वेगळ्या पद्धतीने बघत असल्याचे क्षितीने सांगितले.