मराठीसह बॉलीवूड कलाविश्वात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून क्षिती जोगला ओळखलं जातं. आजवर तिने लोकप्रिय मालिका, चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. अभिनयाव्यतिरिक्त इतर अनेक सामाजिक मुद्द्यांवर क्षिती आपलं स्पष्ट मत मांडत असते. वैयक्तिक आयुष्यात अभिनेत्रीने हेमंत ढोमेशी लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतरही क्षिती आपलं माहेरचं आडनाव लावते यावरून घडलेला एक प्रसंग अभिनेत्रीने नुकत्याच ‘आरपार’ युट्यूब चॅनेलच्या ‘वूमन की बात’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला.
क्षिती सांगते, “आमच्या घरी सरकारी कामकाजानिमित्त मध्यंतरी कोणीतरी आलं होतं. त्यांनी मला माझं नाव विचारलं. मी सांगितलं क्षिती अनंत जोग. पुढे, त्यांनी विचारलं लग्न झालंय का तुमचं? मी म्हटलं हो. मग त्यांनी विचारलं तुमच्या मिस्टरांचं नाव काय? हेमंत ढोमे असं उत्तर मी दिलं. पण, त्यांनी हेमंत जोग असं नाव लिहिलं.”
हेही वाचा : “जहांगीरच्या नावावरून घाणेरड्या भाषेत…”, सिद्धार्थ चांदेकर ट्रोलर्सवर संतापला; चिन्मय मांडलेकरला केली विनंती
अभिनेत्री पुढे म्हणाली, “मी त्यांना लगेच सांगितलं हेमंत जोग नाही हेमंत ढोमे. मग त्यांनी माझं नाव पण क्षिती ढोमे लिहिलं. मी म्हटलं अहो नाही! मी त्यांना शांतपणे बसवलं आणि सांगितलं माझं नाव क्षिती जोग आहे. माझ्या नवऱ्याचं नाव हेमंत ढोमे आहे. या नावाचं माझ्याकडे मॅरेज सर्टिफिकेट आहे. मुळात सरकारने आपल्याला ही सोय दिली आहे. नवऱ्याचं आडनाव लावणं बंधनकारक नाहीये. कारण, उद्या जर मी ठरवलं तर, माझं नाव क्षिती रमेश लाईटवाला सुद्धा असू शकतं. कारण, सरकारने ती सोय दिली आहे.”
हेही वाचा : अयोध्येला पोहोचला रितेश देशमुख! पत्नी जिनिलीया व मुलांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन, फोटो शेअर करत म्हणाला…
“तुम्ही योग्य ती कागदपत्र बनवून तुमचं नाव बदलू शकता. आणि तुम्हाला हवं ते नाव आयुष्यभरासाठी ठेवू शकता. लग्नानंतर नाव बदलायचं की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. प्रत्येकाने त्याच्या मतानुसार हा निर्णय घेतला पाहिजे. आपली भारतीय विचारसरणी जुन्या विचारांची असं काही नाहीये. हा नावाचा गोंधळ सगळीकडे होतो. मला अत्यंत आनंद आहे की, मी भारतात राहते. कारण इथे गर्भपात करणं कायदेशीर आहे. पण, इतर काही देशात बायकांना तेवढंही स्वातंत्र्य देण्यात आलेलं नाही. आपल्याला सरकारने सगळ्या सोयीसुविधा दिल्या आहेत.” असं क्षिती जोगने सांगितलं.