Hemant Dhome & Kshitee Jog : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता व दिग्दर्शक म्हणून हेमंत ढोमेला ओळखलं जातं. आजवर त्याने अनेक गाजलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. याशिवाय चित्रपट, मालिका, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्याने आपल्या अभिनयाची छाप देखील उमटवली आहे. आज हेमंत ढोमेच्या वाढदिवसानिमित्त त्याची पत्नी क्षिती जोगने खास पोस्ट शेअर करत नवऱ्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

आज संपूर्ण कलाविश्वातून हेमंत ढोमेवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. क्षिती जोगने देखील नवऱ्यासाठी हटके पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री लिहिते, “माय पार्टनर… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… असाच उत्साही राहा, कायम आनंदी राहा, आयुष्यात अशीच मेहनत कर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कायम माझा राहा.”

क्षितीच्या पोस्टवर हेमंतची खास कमेंट

क्षितीने या रोमँटिक पोस्टबरोबर काही फोटो देखील शेअर केले आहेत. यापैकी पहिले दोन फोटो रोमँटिक आहेत. तर, तिसरा फोटो काहीसा हटके आहे. यामध्ये हेमंत ढोमे क्षितीच्या बुटांची शू-लेस बांधत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा फोटो पाहून हेमंतने यावर “तिसरा फोटो टाकायचाच होता तुला!!! लव्ह यू” अशी मजेशीर कमेंट केली आहे.

हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. दोघांची पहिली भेट नाटकाच्या सेटवर झाली होती. यानंतर २०१२ मध्ये त्यांनी लग्न केलं.

क्षितीच्या पोस्टवर अभिज्ञा भावे, सीमा घोगळे, चैत्राली गुप्ते या कलाकारांनी कमेंट्स करत हेमंतला शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय चाहत्यांनी देखील अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ हा सिनेमा जानेवारी महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच टी-सीरीज, कलर येल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी निर्मित ‘फसक्लास दाभाडे’चे भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्माते आहेत. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

Story img Loader