गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीत विविध धाटणीचे चित्रपट प्रदर्शित होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर असल्याचे पाहायला मिळत आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातील विविध व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील सनीचा दादा ही व्यक्तिरेखा समोर आली होती. त्यानंतर आता बिनधास्त, आत्मविश्वासू, स्पष्टवक्ती अशी वैदेही ‘सनी’मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या चित्रपटात वैदेहीची भूमिका क्षिती जोग साकारणार आहे.
कॅफे मालक असलेली वैदेही सनीसोबत कधी कठोर वागताना दिसत आहे, तर कधी त्याची काळजीही घेताना दिसत आहे. सनी आणि वैदेहीमध्ये कामासोबतच भावनिक नातं निर्माण झाल्याचेही दिसत आहे. त्यांच्या नात्यातील नेमकी गंमत काय हे ‘सनी’ पाहिल्यावरच उलगडणार आहे. यात तीला जीगरवाली बाई असं म्हणण्यात आलं आहे.
आणखी वाचा : ‘दिल तो पागल है’ ला २५ वर्षे पूर्ण, माधुरी दीक्षितने सांगितले चित्रपटातील आवडते गाणे
या दोघांमधील केमिस्ट्री पडद्यावर उत्तम दिसत आहे. क्षिती जोग आणि ललित प्रभाकरने नाटक आणि मालिकेमध्ये एकत्र काम केले आहे. ‘सनी’च्या निमित्ताने क्षिती आणि ललित आता चित्रपटातही एकत्र दिसणार आहेत.
यापूर्वी क्षिती जोग ‘झिम्मा’ चित्रपटात मिता जहांगिरदार या भूमिकेत दिसली होती. त्यात ती थोडी गोंधळलेली, घाबरट अशी दिसली. मितावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. आता या भूमिकेच्या अगदी विरूद्ध अशी ‘सनी’मधील तिची भूमिका आहे.
आणखी वाचा : “आजपासून बरोबर एक वर्षापूर्वी…” ‘सहकुटुंब सहपरिवार’मधील कलाकारांवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीला मिळाला न्याय
दरम्यान क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित ‘सनी’ हा चित्रपट १८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित, इरावती कर्णिक लिखित या चित्रपटात ललित प्रभाकर, क्षिती जोग यांच्यासह चिन्मय मांडलेकर यांचीही प्रमुख भूमिका आहे. तर अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस आणि उर्फी काझमी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच संतोष खेर, तेजस्विनी पंडित सह-निर्माते आहेत.