महाराष्ट्राचा लाडका दगडू अर्थात प्रथमेश परब लवकरच क्षितिजा घोसाळकरशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. येत्या १४ फेब्रुवारीला प्रथमेश-क्षितिजाचा साखरपुडा होणार आहे. त्यानंतर २४ फेब्रुवारीला दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे सध्या प्रथमेश-क्षितिजाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. पण त्यापूर्वी क्षितिजाने प्रथमेशला एक खास सरप्राईज दिलं आहे; जे सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे.
प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकरची ओळख ‘गुंतले हृदय हे’ या फोटो सीरिजमुळे झाली होती. क्षितिजाची ही फोटो सीरिज प्रथमेशला खूप आवडली होती. त्याने थेट क्षितिजाला मेसेज करून कौतुक केलं होतं आणि इथून दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली होती. म्हणूनच क्षितिजाने लग्नाअगोदर ‘गुंतले हृदय हे’ या फोटो सीरिजचं रिक्रिएशन करून प्रथमेशचा सरप्राईज दिलं. हे सरप्राईज पाहून प्रथमेश काय म्हणाला? जाणून घ्या…
क्षितिजाने ‘गुंतले हृदय हे’ या फोटो सीरिजचं रिक्रिएशन सोशल मीडियावर शेअर केलं आहे. सुरुवातीला काही फोटो शेअर करत तिने लिहिलं, “४ वर्षांपूर्वी, ‘गुंतता हृदय हे’ या एका फोटो सीरिजमुळे माझी आणि प्रथमेशची ओळख झाली. त्याला सीरिज आवडली, त्याने मेसेज करून भरभरून कौतुक केलं आणि पुढे आमचं हळूहळू बोलणं सुरू झालं. बरं ऐरवी कपल प्री वेडिंग (Couple Pre Weddings) वगैरे केलं जातं, अर्थात आम्ही पण करणार आहोत. पण ज्या फोटोशूटमुळे आमच्या प्रेमाची सुरुवात झाली, आज तिचं सीरिज रिक्रिएट करून प्रथमेशला डेडिकेटेड (Dedicate) करावीशी वाटली. म्हणजे ड्युएट फोटोशूट (Duet Photoshoot) असतंच पण आपल्या पार्टनरला डेडिकेटेड करणार, त्याच्याविषयी प्रेम व्यक्त करणार सोलो प्री वेडिंग (Solo Pre Wedding) करायला काय बरं हरकत आहे? मग ठरवलं, करूया की, फक्त यावेळी लव्हस्टोरी आपली, #Realवाली…बरं जुन्या सीरिजमध्ये होती ७०व्या शतकातील लव्हस्टोरी आणि अगदीच वेगळा विषय. त्याचा आमच्या लव्हस्टोरीशी तसा काहीच संबंध नाही. पण जरी आमची ओळख आभासी (Virtually) झाली तरीही आम्ही दोघेही बऱ्यापैकी Old School Typesचं आहोत. या फोटो मधील पत्रासारखी, अनेक पत्र मी त्याच्यासाठी लिहिली. हस्ताक्षर छान यावं म्हणून खाडाखोड केलेली अनेक पत्र, लिहिताना शाईने झालेली काळी निळी बोटं, कधी कधी लिहिता लिहिता आनंदाश्रूनी किंवा त्याच्या आठवणींनी, डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंनी हळूच पुसलेले शब्द, माझ्या पाकिटमध्ये त्याचा नेहमी असणारा पासपोर्ट साइज फोटो (जो या पत्रामध्येही आहे)….अशा एक ना अनेक आठवणींनी हृदयाची कुपी पुन्हा एकदा सुगंधित झाली…पुढील पोस्टमध्ये…”
“प्रथमेश आणि माझ्या आयुष्यातील खूप मौल्यवान आठवणी या डायरीमध्ये आहेत. #आठवणींचेHasgtags म्हणतो आम्ही त्यांना! आमची पहिली भेट, त्याने दिलेलं पहिलं गिफ्ट, पहिल्यांदा एकत्र पाहिलेला सिनेमा… सगळ्याचं #पहिल्यावहिल्या आठवणींचा कोलाज शब्द रुपात बंदिस्त केला आहे. त्याच्यासाठी लिहिलेल्या कविता, पत्र, कॅप्शनस, त्याच्यासाठी लिहिलेली चारोळी आणि त्यातून उमललेल्या भावना, शब्दांनी किती छान व्यक्त करता येतात बरं. आज डायरी वाचत असताना, Destinyचं खूप कौतुक वाटलं, बघता-बघता ४ वर्षे झाली पण… तू दिलेलं golden rose किंवा ‘हे चॉकलेट कदाचित तुझ्याएवढं गोड नसेल, पण तरीही गोड मानून घे’, असं म्हणत त्याने पहिल्यांदा दिलेल्या चॉकलेटचं कव्हर, चॉकलेटच्या गोडव्यापेक्षाही, आज जास्त गोड वाटतंय…पुढील पोस्टमध्ये…”
हेही वाचा – “अभिनंदन बायको!” मुग्धा वैशंपायनला पदव्युत्तर पदवी; प्रथमेश लघाटे आनंद व्यक्त करत म्हणाला, “तुझा खूप…”
“कातर वेळ ही फार कमाल असते. मावळतीस निघालेला सूर्य, त्याच्या विविध रंगछटांनी मनमोहक दिसणारं आकाश, हवेतील मंद गारवा अन् निसर्ग आपल्याबरोबर साधत असलेलं अलवार हितगुज…बरं अशातच जर आसपास पाणी असेल तर मात्र हा निसर्ग तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रेमात पाडतो. पब, क्लब, मोठमोठे रेस्टॉरंट यात कधीही न रमणारे आम्ही दोघे, अशा ठिकाणी मात्र तासनतास रमतो. जर आमच्यापैकी कोणालाही यायला उशीर झाला तरीही एकमेकांची वाट बघण्यात आम्ही रममाण होतो. प्रथमेश तुझी वाट बघायला मला नेहमीच आवडते….म्हणूनच…
येणारच तू भेटण्यास
तर जिवलग प्रियकर होऊन ये,
धूसर स्वप्नी स्वरासारखा
उत्कट आतुर होऊन ये…
पापणीतून स्वप्न उतरते तसाच अलगद अवचित ये,
जगा न कळता…मला न कळता…स्वतः तुलाही न कळता नकळत ये…
कारण…
भूतकाळातील आपल्या आठवणींमध्ये,
वर्तमानातील सवयींमध्ये अन
भविष्यातील स्वप्नांमध्ये…
माझे आणि तुझे….’गुंतले हृदय हे’
अशा सलग तीन पोस्ट शेअर करून क्षितिजाने प्रथमेशला छान सरप्राईज दिलं. हे सरप्राईज पाहून प्रथमेश म्हणाला, “You are full of Surprises…खूप प्रेम…किती भारी वाटतंय हे बघून सिनेमातल्या छान फ्लॅशबॅक सारखं.. प्रेमात थोडं old school असणं भारी असतं.. हे खरंय…मी जाईपर्यंत तुझं थांबणं शेवटपर्यंत राहू दे….आय लव्ह यू…किती छान लिहितेस तू….इतकं भारी वाटतंय….अजून एकदा प्रेमात पडलास मला…खूप प्रेम…”
दरम्यान, प्रथमेशच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याचा ‘डिलिव्हरी बॉय’ हा नवा चित्रपट उद्या, ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रथमेशच्या साथीला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप, अंकिता लांडेपाटील असे बरेच कलाकार पाहायला मिळणार आहेत.