मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Lakshmikant Berde) हे त्या कलाकारांपैकी एक आहेत. १९८४ साली प्रदर्शित झालेल्या ‘लेक चालली सासरला’ या चित्रपटात छोटीशी भूमिका साकारत त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर महेश कोठारे यांच्यासोबत ‘धुमधडाका’ या चित्रपटात साकारलेल्या महत्त्वाच्या भूमिकेतून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले.
अनेक चित्रपटांतून वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. आजही त्यांच्या अनेक आठवणी सहकलाकार, कनिष्ठ कलाकार सांगताना दिसतात. आता अभिनेता सुशील इनामदारने एका मुलाखतीदरम्यान, लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काय सल्ला दिला होता, हे सांगितले आहे.
काय म्हणाला अभिनेता?
अभिनेता सुशील इनामदारने नुकतीच ‘अल्ट्रा मराठी बझ’ला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान लक्ष्मीकांत बेर्डेने काय सल्ला दिला होता, हे सांगताना अभिनेता म्हणाला, “मी जेव्हा पहिल्या व्यावसायिक नाटकामध्ये लक्ष्यामामाबरोबर काम केलं, तेव्हा एकदा सहज बोलता बोलता मामा आम्हाला म्हणाला होता की, तुम्ही अभिनेते म्हणून कमी-जास्त असू शकता; पण माणूस म्हणून तुम्ही चांगलेच असले पाहिजे. जो माणूस म्हणून चांगला असतो, तो कधी ना कधी अभिनेता म्हणून चांगला होतोच होतो. कारण- माणूस म्हणून तुम्ही चांगले असता, तेव्हा तुम्ही इतरांचे निरीक्षण करता, ते तुमच्या अभिनयात येतं,” असे सुशील इनामदारने म्हटले आहे.
जान्हवी किल्लेकरने जोकर म्हणत पंढरीनाथ कांबळेचा अपमान केला होता. त्यावर बोलताना लक्ष्मीकांत बेर्डेने काय सल्ला दिला होता, याची आठवण अभिनेत्याने सांगत पॅडीदेखील माणूस म्हणून चांगला आहे, असे त्याने म्हटले आहे. अशा माणसाबद्दल जान्हवी किल्लेकरने केलेले वक्तव्य हास्यास्पद असून, मला तिची कीव येते, असे म्हणत अभिनेत्याने आपला संताप व्यक्त केला आहे. याबरोबरच, इतर सदस्यांच्या खेळावरही त्याने भाष्य केले आहे.
हेही वाचा: लोकप्रिय गायक जस्टिन बीबर झाला बाबा, बाळाचा फोटो शेअर करून जाहीर केलं नाव
दरम्यान, लक्ष्मीकांत बेर्डे या अभिनयाची आजही चर्चा होताना दिसते. आपल्या वेगळ्या अंदाजाने त्यांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले होते. त्यांचा आजही वेगळा चाहतावर्ग आहे. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होती. लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुख्य भूमिका असलेले ‘धडाकेबाज’, ‘एक गाडी बाकी अनाडी’, ‘खतरनाक’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘अशीही बनवाबनवी’, ‘एकापेक्षा एक’, ‘शेम टू शेम’, ‘झपाटलेला’, ‘दे दणादण’, असे अनेक चित्रपट लोकप्रिय ठरले आहेत.