सुचित्रा आणि आदेश बांदेकर यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. या जोडप्याने १९९० मध्ये लग्नगाठ बांधली. आता त्यांच्या सुखी संसाराला जवळपास ३३ वर्षे पूर्ण झाली आहेत. सुचित्रा-आदेश यांच्या लग्नाला सुरुवातीला घरच्यांनी विरोध केला होता. त्यामुळे या दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. कोर्टमॅरेज झाल्याने दोघांचं रितसर असं लग्न झालेलं नव्हतं. ही गोष्ट जेव्हा दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवलकर यांना समजली तेव्हा त्यांनी पुढाकार घेऊन आदेश व सुचित्रा यांचं लग्न लावून दिलं होतं. हा किस्सा नेमका काय आहे याबद्दल स्वत: सुचित्रा बांदेकरांनी सुलेखा तळवलकरांच्या ‘दिल के करीब’ या कार्यक्रमात खुलासा केला आहे.
सुचित्रा बांदेकरांना या प्रसंगाविषयी विचारलं असता त्या म्हणाल्या, “आमचं लग्न म्हणजे… आम्ही पळून जाऊन कोर्टमॅरेज पद्धतीत लग्न केलं होतं. आम्ही ९० साली लग्न केलं म्हणजे आता जवळपास आमच्या लग्नाला ३३ वर्षे झाली आहेत. याचा किस्सा सांगायचा झाला तर, ‘अवंतिका’ मालिकेत माझं आणि आदेशचं लग्न असतं…मालिकेत त्या मुलीला म्हणजे मला संबंधित मुलगा अजिबात आवडत नसतो. असं एकंदर कथानक चालू होतं. पण, हा सीक्वेन्स चालू असताना आदेश खूप आनंदी होता. त्यावेळी सेटवर स्मिता ताई सुद्धा होत्या. त्या म्हणाल्या, अरे आदेश एवढा काय आनंद… उलटं लग्न का होतंय असं वाटलं पाहिजे ना तुला? तेव्हा आम्ही तिला सांगितलं ‘अगं आमचं आधी कोर्टमॅरेज झालं त्यानंतर आम्ही असंच आदेशच्या घरी अगदी साधं लग्न केलं.’ हे सगळं ऐकल्यावर स्मिता ताई काहीच बोलली नाही.”
हेही वाचा : Video : लाल साडी, भरजरी दागिने, केसात गजरा अन्…; अखेर समोर आला ‘पुष्पा २’च्या श्रीवल्लीचा पहिला लूक
“आमचं म्हणणं ऐकल्यावर तिने आम्हाला न सांगता सगळी तयारी केली होती. संपूर्ण लग्नाचा घाट घातला होता. लग्न लावणारा गुरुजी पण ओळखीचा होता. जिलेबी, मसाले भात असं साग्रसंगीत जेवण तिने ठेवलं होतं. शंभर एक माणसं त्या दिवशी आली होती. त्यानंतर ती सांगत होती, ‘बघ… तुझं लग्न नीट झालं नव्हतं ना… आता एवढ्या लोकांच्या उपस्थितीत मी तुझं लग्न लावून देतेय.’ तिचं मन खूपच मोठं होतं…ते व्यक्तिमत्त्व खूप वेगळं होतं आणि अजूनही ती कायम आपल्याबरोबर आहे.” असं सांगत सुचित्रा बांदेकरांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
दरम्यान, सुचित्रा बांदेकर ‘रथचक्र’ या मालिकेत काम करत असताना या दोघांची पहिली भेट झाली होती. पहिल्या नजरेतच आदेश बांदेकर त्यांच्या प्रेमात पडले होते. सुचित्रा यांच्या घरून त्यांच्या प्रेमाला विरोध असल्यामुळे त्या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं होतं. त्यांच्या वैवाहिक आयुष्याला आता ३३ वर्षे पूर्ण झाली असून दोघेही सुखाने संसार करत आहेत.