‘जहाँ जायेगा वहीं रौशनी लुटाएगा किसी चराग का अपना मकाँ नहीं होता’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजस्थानच्या टोंकमधल्या लहानशा गावातील नवाबी कुटुंबातील मुलगा अभिनयाच्या ओढीने मुंबईपर्यंत आला अन् ‘सलाम बॉम्बे’ म्हणत त्याने मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतली. अभिनय क्षेत्रात कोणतंही पाठबळ नसताना हा मुलगा हॉलीवूडपर्यंत मजल मारेल याचा कोणी विचारही केला नव्हता. दूरदर्शन मालिकांपासून कारकिर्द सुरू करणाऱ्या साहबजादे इरफान खानचा जन्म ७ जानेवारी १९६७ रोजी झाला. योग्य चित्रपटांची निवड, हिंदी भाषेवर प्रभुत्व व दमदार अभिनयाच्या जोरावर इरफानने बॉलीवूडमध्ये स्वत:चा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला. केवळ बॉलीवूडच नव्हे तर आजच्या घडीला अनेक मराठी कलाकारांसाठी इरफान प्रेरणास्थान आहे. त्याचं अचानक जाणं अनेकांना चटका लावून गेलं.

बॉलीवूडसह हॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या या इरफानचं काही मराठी कलाकारांच्या आयुष्यात खूप मोठं स्थान आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री त्याला बाबा म्हणायची, तर दुसऱ्या एका अभिनेत्याने चक्क इरफानच्या चित्रपटातील भूमिकेचा संदर्भ घेत आपल्या लेकीचं नाव ठेवलंय. आज हा दिग्गज कलावंत आपल्यात नसला, तरीही त्याच्या आठवणी मनात कायम आहेत.

हेही वाचा : Video : ‘ओले आले’चा नेमका अर्थ काय? कलाकारांनीच केला खुलासा, पाहा विशेष मुलाखत

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अधिपती साकारणाऱ्या ह्रषिकेश शेलारच्या आयुष्यात इरफानचं महत्त्व मोठ्या भावासमान आहे. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत ह्रषिकेशने इरफानबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी त्याला खास आभासी फोन केला होता. यावेळी ह्रषिकेश अभिनेत्याला उद्देशून म्हणतो, “इरफान…तू मला आणि माझ्यासारख्या असंख्य अभिनेत्यांना आमचा मोठा भाऊ वाटतोस. तू लवकर गेलास पण, आजही आमच्या सर्वांमध्ये उरुन आहेस. भारतातले असो किंवा बाहेरचे आज प्रत्येकामध्ये एक-एक इरफान आहे आणि हीच तुझी एक नट म्हणून ताकद आहे. कोण कुठला तू…जयपूरहून मुंबईत आलास अन् कोण कुठला मी सांगलीतील एक मुलगा. आपल्यात काहीच नातं नव्हतं पण, तू गेलास आणि मी आयुष्यात कधीही रडलो नसेन एवढा रडलो. त्या दिवशी रडून रडून पोटातही खड्डा पडला होता. कॅमेऱ्यासमोर एक विचार तू राबवलास म्हणूनच आम्हा तरुणांसाठी तू खूप ग्रेट आहेस. तू वाट दाखवल्यावर त्या वाटेवरून चालत राहणं…अजून पुढे जाणं हे खूप सोपं आहे. पण, तू ज्या काळात अभिनय क्षेत्रात आलास आणि जे काम केलंस त्यासाठी खरंच शब्दही अपुरे आहेत. वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेला छेद देऊन काहीतरी नवीन करणं ही खरंच मोठी गोष्ट आहे. आज लोकही बोलतात इरफान साहब जैसा काम करो…हे वाक्य तू कमावलंस. या जन्मात तुझी भेट झाली नाही ही खूप मोठी खंत कायम मनात राहणार…पण हरकत नाही. कारण, तूच म्हणतोस ना ‘जहाँ जायेगा वहीं रौशनी लुटाएगा किसी चराग का अपना मकाँ नहीं होता’ आज तू जिथे असशील तिथेही असाच सर्व लोकांना प्रकाश देत असशील.”

ह्रषिकेश शेलारच्या लाडक्या लेकीचा जन्म गेल्यावर्षी झाला. इरफानच्या ‘हैदर’ चित्रपटातील ‘रुहदार’ या भूमिकेवरून अभिनेत्याने आपल्या लेकीचं नाव ‘रुही’ असं ठेवलं आहे. इरफानच्या जन्मदिनी लेकीचा जन्म व्हावा अशी ह्रषिकेशची प्रचंड इच्छा होती. परंतु, रुहीचा जन्म १२ जानेवारीला झाला. दोघांची जन्मतारीख सारखी नसली, तरीही दोघांच्या जन्मदिनाचा महिना एकच असल्याने ह्रषिकेश प्रचंड आनंदी झाला होता. यामुळेच त्याने लेकीचं नाव इरफानशी संबंधित रुही असं ठेवलं.

हेही वाचा : शाहरुख खान : ४ वर्षांच्या ब्रेकनंतर ‘पठाण’ने बाजी पालटली अन् सांगितलं मीच खरा ‘बादशहा’!

‘बिल्लू’च्या निमित्ताने भेटला ऑनस्क्रीन बाबा

अभिनेत्री मिताली मयेकरने इरफान खानबरोबर २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बिल्लू’ चित्रपटात काम केलं होतं. चित्रपटात इरफानच्या ऑनस्क्रीन लेकीची भूमिका साकारत असल्याने खऱ्या आयुष्यात सुद्धा मितालीने त्याला ‘बाबा’ म्हणायला सुरुवात केली. दोघांनी सेटवर जवळपास १ महिना एकत्र शूटिंग केलं होतं. या काळात अभिनेत्याने मितालीची वडिलांप्रमाणे काळजी घेत तिला मार्गदर्शन केलं होतं. एवढ्या मोठ्या दिग्गज अभिनेत्याबरोबर स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळणं ही मितालीसाठी खूप मोठी गोष्ट होती. त्यातही इरफानशी तयार झालेलं वेगळं बॉण्डिंग तिच्या आजही स्मरणात आहे.

हेही वाचा : रितेश विलासराव देशमुख : मुख्यमंत्री वडिलांचा सल्ला मानला अन् लातूरच्या हिरोने महाराष्ट्राला ‘वेड’ लावलं

ह्रषिकेश, मितालीप्रमाणे किरण माने, मिथिला पालकर, सचिन खेडेकर, समीर परांजपे या कलाकारांच्या आयुष्यात देखील इरफान खानचं एक वेगळं स्थान आहे. कोणासाठी भाऊ, तर कोणासाठी जीव की प्राण असलेल्या इरफानने २९ एप्रिल २०२० मध्ये या जगाचा निरोप घेतला. न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर या गंभीर आजाराने इरफान त्रस्त होता. अखेर वयाच्या ५४ व्या वर्षी मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान या हरहुन्नरी कलाकाराची प्राणज्योत मालवली.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Late irrfan khan birth anniversary marathi actors hrishikesh shelar and mitali mayekar recalls memories entdc sva 00
Show comments