लक्ष्मीकांत पांडुरंग बेर्डे ऊर्फ लक्ष्यामामा. हे नाव जरी ऐकलं तरी आपसूक मनात एक खंत निर्माण होते आणि ती म्हणजे आज ते आपल्यात का नाहीत?, आज लक्ष्मीकांत असायला पाहिजे होते. लक्ष्मीकांत बेर्डे हे महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातलं असं एक ताईत आहे; जे पिढ्यान पिढ्या टिकून असेल. दुःख मनात ठेवून प्रेक्षकांना खळखळून हसवत ठेवण्याचा वसाच त्यांनी जणू त्यांनी हाती घेतला होता. ‘लक्ष्या ते वेताळे गुरुजी’पर्यंतचा त्यांचा प्रवास मात्र काही सोपा नव्हता. सिनेसृष्टीत येण्यासाठी त्यांना खूप मेहनत व संघर्ष करावा लागला. पण, त्यांनी सिनेसृष्टीत ठेवलेलं पाऊल आणि त्यांची कामगिरी चिरस्मरणीय राहणार आहे. ‘मी आलो… मी पाहिलं… मी लढलो.. मी जिंकून घेतलं सारं’ या गाण्याच्या ओळीप्रमाणेच त्यांचा जीवनप्रवास राहिला आहे. आज लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्मदिवस. त्याच निमित्ताने त्यांचा हा अविस्मरणीय असा सिनेसृष्टीतील जीवनप्रवास आपण जाणून घेणार आहोत.

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९५४ साली मुंबईत झाला. गिरगावातील कुंभारवाड्यात त्यांचं संपूर्ण बालपण गेलं. युनियन हायस्कूलमध्ये त्यांनी शालेय शिक्षण घेतलं होतं; तर उच्च शिक्षण चर्नी रोड येथील भवन्स कॉलजेमध्ये झालं होतं. एकांकिका, नाटकाचं वेड हे त्यांना कॉलेजमध्ये असल्यापासून होतं. ते अभिनयात खूप रमायचे. भाऊ बेर्डे ही बेर्डे बंधूंची एक संस्था होती, त्या संस्थेमार्फत ते कोकणात एकांकिका, नाटक करायचे. नाट्य क्षेत्रात त्यांना महत्त्वाचं वळणं मिळाले ते म्हणजे ‘टुरटुर’ नाटकामुळे. त्यांचा चुलतभाऊ म्हणजे पुरुषोत्तम बेर्डे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘टुरटुर’ नाटकामुळे लक्ष्मीकांत बेर्डेंना खरी ओळख मिळाली. यापूर्वी त्यांनी बरीच संगीत नाटकं, बालनाटकं केली, तमाशा केला. पण, त्यांना म्हणावं तसं यश मिळतं नव्हतं; जे ‘टुरटुर’ नाटकामुळे मिळालं. सुरुवातीला या नाटकाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, पुरुषोत्तम बेर्डेंनी केलेल्या जाहिरातींमुळे या नाटकाकडे प्रेक्षक वळले.

kranti redkar shares special post for husband sameer wankhede
“२७ वर्षांपूर्वी त्यांना पहिल्यांदा पाहिलं…”, क्रांती रेडकर अन् समीर वानखेडेंच्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण, दोघांची पहिली भेट कुठे झाली?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Khashaba Jadhav, Olympic , Bronze Medal ,
खाशाबा आज हयात असते तर…
sharad pawar slams amit shah news in marathi
देशाचे पहिले तडीपार गृहमंत्री! शरद पवारांचा अमित शहांवर प्रतिहल्ला
a beautiful sadhvi who came in mahakumbh mela became famous
Video : सुखी जीवन सोडून २८ व्या वर्षी साध्वी झालेली सौंदर्यवती चर्चेत, महाकुंभ मेळ्यातील व्हिडीओ व्हायरल
balmaifal story for children
बालमैफल : मी… अनादी, अनंत!
Devdutt Padikkal smashes hundred in quarterfinal against Baroda in Vijay Hazare Trophy 2025
Vijay Hazare Trophy : १५ चौकार अन् २ षटकार… देवदत्त पडिक्कलची शतकी खेळी बडोद्यावर पडली भारी
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…

हेही वाचा – तत्त्वज्ञानात पदवी, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रभाव ते चुंबनदृश्यांसाठी प्रसिद्ध अभिनेत्री

१९८३ हे वर्ष लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासाठी फार महत्त्वाचं होतं. याच वर्षी ‘टुरटुर’ नाटकानंतर शांतेचं कार्ट चालू आहे’ हे लक्ष्मीकांत यांचं नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आलं. या नाटकाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं होतं. याच नाटकामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांना पहिला चित्रपट मिळाला. ‘हसली की फसली’ हा त्यांचा पहिला चित्रपट; जो काही कारणास्तव पूर्ण न झाल्यानं प्रदर्शित होऊ शकला नाही. याच वर्षी लक्ष्मीकांत बेर्डे यांचं पहिलं लग्न रुही यांच्याबरोबर झालं. ‘वेडी माणसं’ या नाटकात दोघांची भेट झाली होती. त्यानंतर ‘कशात काय लफड्यात पाय’ या नाटकाच्या वेळीस लक्ष्मीकांत व रुही यांचं प्रेम प्रकरण सुरू झालं. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सात वर्षं साहित्य संघात नोकरी करीत नाटकं केली. अभिनयाची जितकी आवड, तितकीच त्यांना वाचनाचीदेखील आवड होती. पु.ल. देशपांडे यांचं ‘व्यक्ती आणि वल्ली’ हे त्यांचं आवडीचं पुस्तक.

त्या काळातील चॉकलेट बॉयच्या दुनियेत लक्ष्मीकांत यांनी आपल्या अभिनय व विनोदी शैलीच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. १९८४ साली ‘लेक चालली सासरला’ चित्रपटाद्वारे लक्ष्मीकांत बेर्डेंनी खऱ्या अर्थानं मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर ‘धुमधडाका’ चित्रपटामुळे त्यांना अधिक प्रसिद्धी मिळाली. मग ‘गडबड गोंधळ’, ‘आम्ही दोघे राजा राणी’, ‘दे दणादण’, ‘प्रेम करूया खुल्लम खुल्ला’, ‘अशी ही बनावाबनवी’, ‘मज्जाच मज्जा’, ‘एक गाडी बाकी अनाडी’, ‘फेकाफेकी’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘भुताचा भाऊ’, ‘थरथराट’, ‘हमाल दे धमाल’, ‘धडाकेबाज’ अशा अनेक चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत यांनी विनोदीसह गंभीर भूमिका केल्या. या भूमिका प्रेक्षकांच्या मनात ठसठशीतपणे कोरल्या गेल्या. त्या काळात मराठी सिनेसृष्टीत ‘अशोक-लक्ष्या’ आणि ‘महेश-लक्ष्या’ अशी जोडगोळ्या खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाल्या होत्या.

हेही वाचा – इच्छा होती वैमानिक आणि डॉक्टर होण्याची, झाला विचारी अभिनेता; गुड्डू पंडित फेम अली फजलची भरारी

लक्ष्मीकांत बेर्डे हे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले होते. मराठीत सुरू असलेल्या धडाकेबाज कामांमुळे लक्ष्मीकांत यांना हिंदीतही चित्रपट मिळू लागले. १९८९ साली सलमान खानच्या ‘मैने प्यार किया’ या गाजलेल्या चित्रपटातून लक्ष्मीकांत यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यांनी साकारलेली मनोहरची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतील उतरली. एका मुलाखतीमध्ये लक्ष्मीकांत यांनी सलमान खानचा एक किस्सा सांगितला होता. ‘मैने प्यार किया’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी सलमानला कोणीतरी सांगितलं होतं की, लक्ष्मीकांतपासून सावध राहा. ते आयत्या वेळी अ‍ॅडिशन घेतात वगैरे. त्यामुळे चित्रीकरणाच्या सुरुवातीला सलमान खान लक्ष्मीकांत यांच्याशी बोलायचा नाही. त्यामुळे त्यांनी सलमानचा जाऊन विचारलं, माझ्याशी तू असा का वागतोयस? कारण- जोपर्यंत आपलं ट्युनिंग जमणार नाही, तोपर्यंत आपले सीन चांगले होणार नाहीत. आपलं ट्युनिंग जमणं खूप महत्त्वाचं आहे, असं त्यांनी सलमान खान यांना समजावलं. मग हळूहळू सलमान व लक्ष्मीकांत यांच्यातील नातं खुलत गेलं. या चित्रपटातील अभिनेत्री भाग्यश्री मराठी असल्यामुळे तिला लक्ष्मीकांत यांच्या कामाबद्दल माहीत होतं. इतकंच नाही, तर त्या लक्ष्मीकांत यांच्या चाहत्या होत्या. त्यामुळे त्या लक्ष्मीकांत यांच्याबरोबर खुलेपणानं बोलायच्या.

हेही वाचा – अपघातामुळे वजन गेलं शंभरीपार.. अलका कुबल यांनी कशी केली त्यावर मात? जाणून घ्या त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल

दरम्यान, ज्याप्रमाणे मराठीत लक्ष्मीकांत यांची बॅटिंग सुरू होती, तशीच ती हिंदीतही सुरू झाली. ‘मैने प्यार किया’ चित्रपटानंतर ‘साजन’, ‘१०० डेज’, ‘गीत’, ‘दिल का क्या कसूर’, ‘बेटा’, ‘फूल और अंगार’, ‘सैनिक’, ‘हस्ती’, ‘हम आपके है कौन’ यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांत त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. या संपूर्ण कारकिर्दीत लक्ष्मीकांत यांचा ‘एक होता विदूषक’ हा चित्रपट उजवा ठरला, असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही. या चित्रपटात त्यांनी साकारलेली सोंगाड्या (आबुराव) ही भूमिका मनाला चटका लावून जाणारी होती. त्यानंतर १९९३ साली ‘झपाटलेला’ या चित्रपटातील बोलक्या बाहुल्यांचा खेळ करणाऱ्या ‘लक्ष्या’ ही त्यांची भूमिका विशेष गाजली. २००४ साली प्रदर्शित झालेला ‘पछाडलेला’ हा लक्ष्मीकांत यांचा शेवटचा चित्रपट ठरला. त्या चित्रपटातील वेताळे गुरुजी ही त्यांची शेवटची भूमिका होती. १६ डिसेंबर २००४ लक्ष्मीकांत बेर्डे यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांचं निधन त्यांच्या सर्वच चाहत्यांना जीवाला चटका लावून जाणार होतं. आज जरी सर्वांचे लाडके अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे शरीराने आपल्यात नसले तरी इतिहासातील लक्ष्मीकांत बेर्डे नावाचं हे सोनेरी पान कायम आपल्याबरोबर असणार आहे. त्यांचा हा जीवनप्रवास नवोदित कलाकारांसाठी नक्कीच प्रेरणादायी असणार आहे.

Story img Loader