‘धूमधडाका’, ‘दे दणादण’, ‘चल लक्ष्या मुंबईला’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘एक होता विदूषक’ अशा एकापेक्षा एक गाजलेल्या चित्रपटांमधून लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. मराठीसह हिंदी कलाविश्वात या दिग्गज अभिनेत्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. या हरहुन्नरी अभिनेत्याने १६ डिसेंबर २००४ रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं अचानक जाणं हा कलाविश्वासह त्यांच्या जवळच्या मित्रमंडळींसाठी मोठा धक्का होता. आजही प्रत्येक कार्यक्रमात सचिन पिळगांवकर, अशोक सराफ यांसारखे ज्येष्ठ अभिनेते लक्ष्मीकांत यांची आवर्जून आठवण काढतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लक्ष्मीकांत यांचे बंधू पुरुषोत्तम बेर्डे यांनी भावाबद्दल अनेक खुलासे केले आहेत. ‘सिनेमागल्ली’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत निर्माते पुरुषोत्तम बेर्डे नेमकं काय म्हणाले जाणून घेऊयात…
लक्ष्मीकांत बेर्डे आज आपल्यात नसले तरीही त्यांच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. त्या काळात लक्ष्मीकांत यांनी त्यांच्या चुलतभावाबरोबर नाटकांमध्ये काम केलं. ‘टूरटूर’ या गाजलेल्या नाटकाचं दिग्दर्शन त्यांचे चुलत भाऊ पुरुषोत्तम बेर्डे यांनी केलं होतं. सुरुवातीला या नाटकाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, पुरुषोत्तम बेर्डेंनी केलेल्या जाहिरातींमुळे या नाटकाकडे हळुहळू प्रेक्षक वळले. यामुळे लक्ष्मीकांत यांना घरोघरी ओळख मिळाली. मराठी कलाविश्वात जम बसवल्यावर त्यांनी १९८९ मध्ये सलमान खानच्या ‘मैंने प्यार किया’ या लोकप्रिय चित्रपटातून त्यांनी हिंदी कलाविश्वात पदार्पण केलं. त्यांच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
हेही वाचा : मुग्धा वैशंपायनच्या सासऱ्यांनी बनवले गरमागरम बटाटेवडे, सुनबाई फोटो शेअर करत म्हणाली, “आरवलीला…”
२००४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘पछाडलेला’ हा त्यांच्या आयुष्यातील शेवटचा चित्रपट ठरला. त्यांचं निधन प्रत्येकाला चटका लावून जाणारं होतं. १६ डिसेंबर २००४ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. लक्ष्मीकांत यांच्या एकंदर प्रवासाबद्दल त्याचे चुलत बंधू पुरुषोत्तम बेर्डे यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं आहे.
लक्ष्मीकांत यांच्याबद्दल कोणत्या गोष्टीची खंत वाटते असं विचारलं असता पुरुषोत्तम बेर्डे म्हणाले, “लक्ष्मीकांतच आज नसणं हा माझ्यासाठी खूप मोठा लॉस आहे. आम्हा दोघांमध्ये दिलखुलास गप्पा कधीही झाल्या नाहीत. आम्ही एकमेकांशी नेहमी शांतपणे बोलायचो. काहीही न बोलता मनातल्या भावना आम्हाला कळून जायच्या. त्याचा माझ्यावर प्रचंड विश्वास होता, तसा माझा सुद्धा त्याच्यावर खूप विश्वास होता. मला असं वाटतं हळुहळू त्याने स्वत:ला संपवलं. ही माझी सर्वात मोठी खंत आहे. कारण, लहानपणापासून त्याने कधीही कोणाचंही ऐकलं नाही. सुपरस्टार पद मिळालं त्यानंतर त्याला अध्यात्माची गरज होती. पण, मी लक्ष्मीकांतला ‘तू या या गोष्टींपासून लांब राहा’ असं कधीच सांगू शकलो नाही.”
“आयुष्यात जो अहंकारावर मात करतो, तोच या कलाक्षेत्रात टिकून राहतो. याचं उदाहरण द्यायचं झालं, तर जितेंद्र कुमार, अशोक सराफ…अशी बरीच मंडळी आहेत. लक्ष्मीकांतने त्याच्या बायकोचं तरी ऐकलं पाहिजे होतं. आज अशोक सराफ यांची संपूर्ण जीवनशैली निवेदिता सांभाळते. आज ते वयाच्या ७५ व्या वर्षी महाराष्ट्र भूषण झाले. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. कलाकारासाठी त्याचं शरीर हे खूप महत्त्वाचं माध्यम असतं. तुमचं शरीरचं तुम्ही घालवलं, तर तुम्ही फोटोशिवाय कुठे जाणार? आणि फोटोला कधीच महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री मिळणार नाही. हे शरीर आहे म्हणून तुम्ही लोकांसमोर जाता. शरीर ज्यादिवशी नष्ट होईल तेव्हा तुम्ही अभिनेते म्हणून संपाल अन् एकंदर सगळंच संपतं. त्यामुळे शरीर या माध्यमाची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. यासाठी आयुष्यात गुरु पाहिजे. अध्यात्मिक गुरु नेहमीच तुम्हाला चांगला मार्ग दाखवतील.” असं पुरुषोत्तम बेर्डेंनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, “आपल्याला गुरु कोणत्याही स्वरुपात लाभू शकतो. तुमची गुरु तुमची पत्नी देखील असू शकते. मी माझ्या पत्नीचं सगळं ऐकतो. पण, लक्ष्मीकांत हा संपूर्णपणे स्वत: निर्णय घ्यायचा. त्याला जरी कोणी सेक्रेटरी असला तरी, अंतिम गोष्टी तो सांगेल त्याच व्हायच्या. त्यामुळे त्याने कोणाचं ऐकलं असतं तर फार बरं झालं असतं. वैयक्तिक आयुष्यात त्याने नेमकं कोणाला आत्मसमर्पण केलं होतं, हे मला शेवटपर्यंत समजलं नाही. त्याने कोणाचंही ऐकलं नाही आणि आपण सगळ्यात मोठ्या गोष्टीला मुकलो.”
“आज तो असता तर, अनेक गोष्टी वेगळ्या असत्या. अगदी शेवटी मला तो येऊन भेटला आणि त्याने मला सांगितलं मला एक गंभीर विषयावर आधारलेलं नाटक करायचंय. माझ्याकडून त्याने ‘सर आली धावून’ हे नाटक लिहून घेतलं आणि त्याच्या शेवटच्या काळात या नाटकात त्याने काम केलं. पण, आजच्या घडीला तो नसणं हा सगळ्यात मोठा लॉस आहे आणि याचं कारणही तो स्वत:च आहे. त्याने कोणाच्याही अंडर काम केलं नाही, कोणाचं ऐकलं नाही आणि आज आपल्याला मोठा फटका बसला.” अशी खंत पुरुषोत्तम बेर्डे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, आता दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेसृष्टीत पदार्पण केलं. नुकताच तो ‘बॉईज ४’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. लक्ष्मीकांत यांचं निधन झाल्यावर प्रिया बेर्डे यांनी दोन्ही मुलांचा सांभाळ केला. अभिनयने सिनेविश्वात पदार्पण केल्यापासून त्याच्या प्रत्येक चित्रपटाची प्रिया बेर्डे आवर्जून दखल घेतात.