मराठी रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. गिरगावातील कुंभारवाड्यात जन्मलेल्या लक्ष्मीकांत बेर्डे यांनी जवळपास दोन दशकं मराठी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. आपल्या दमदार अभिनयाने आणि विनोदी शैलीने लक्ष्या मामांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. ‘मी आलो… मी पाहिलं… मी लढलो…मी जिंकून घेतलं सारं’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे लक्ष्मीकांत बर्डेंचा जीवनप्रवास राहिला आहे. आज लक्ष्मीकांत बेर्डे यांचा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने लेक स्वानंदी बेर्डेने सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहिली आहे.

‘लेक चालली सासरला’ चित्रपटाच्या माध्यमातून १९८४ साली लक्ष्मीकांत बेर्डेंनी मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर ‘धुमधडाका’, ‘दे दणादण’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘मज्जाच मज्जा’, ‘एक गाडी बाकी अनाडी’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘भुताचा भाऊ’, ‘थरथराट’, ‘हमाल दे धमाल’, ‘धडाकेबाज’ अशा अनेक चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डेंनी विविधांगी भूमिका साकारल्या. कधी गंभीर भूमिकेतून प्रेक्षकांना रडवलं. तर कधी विनोदी भूमिकेतून प्रेक्षकांना खळखळून हसवलं. त्यांच्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या मनात ठसठशीतपणे कोरल्या गेल्या आहेत. जरी ते आज हयात नसले तरी पिढ्यान पिढ्या मराठी सिनेरसिकांच्या मनात कायम असणार आहेत.

हेही वाचा – ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील कलाकारांची ग्रेट भेट; निमित्त आहे खूपच खास

आज लक्ष्मीकांत बेर्डेंच्या स्मृतीदिनानिमित्ताने नुकतीच स्वानंदी बेर्डेने भावुक पोस्ट शेअर केली आहे. लक्ष्मीकांत बेर्डेचा एक जुना सुंदर फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे, “बाबा तुम्हाला जाऊन २० वर्ष उलटून गेली, पण तुमच्या आठवणी अजूनही ज्वलंत वाटतात. तुमचा दयाळूपणा, विनोदीबुद्धी आणि अतूट प्रेमाने एका व्यक्तीला आणि मला आकार दिला.”

पुढे स्वानंदी बेर्डेने लिहिलं, “इतक्या वर्षानंतरही तुमचे चाहते तुमच्या कामाची, विनोदाची प्रशंसा करत आहेत. तुम्ही सगळ्यांवर जबरदस्त छाप सोडली आहे आणि हा तुम्ही सोडलेल्या अविश्वसनीय वारशाचा एक पुरावा आहे. मी दिवसेंदिवस तुमच्यावर अधिक प्रेम करत आहे. तुमची मला खूप आठवण येत आहे. तुमची अनुपस्थिती ही आम्हाला नेहमी गमावलेल्या मौल्यवान वेळेची सतत आठवण करू देत असते. पण, तुमचा आत्मा मला आयुष्यातल्या आव्हानांमध्ये मार्गदर्शन करतो. बाबा, आपण पुन्हा भेटत राहू.” याशिवाय अभिनय बेर्डेने इन्स्टाग्राम स्टोरीवर लक्ष्मीकांत बेर्डेंचा व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा – “…आणि हे घडलं”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली, “प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं…”

हेही वाचा – Video: “जरी ती बोल्ड असली तरी…”, शिव ठाकरेने पूनम पांडेच्या ‘त्या’ व्हिडीओवरून पापाराझींना सुनावलं; म्हणाला…

दरम्यान, स्वानंदीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिने ‘रिस्पेक्ट’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. तसंच तिने ‘धनंजय माने इथेच राहतात’ या नाटकातून रंगमंचावरही पदार्पण केलं. या नाटकात स्वानंदीबरोबर तिची आई प्रिया बेर्डे मुख्य भूमिकेत होत्या.

Story img Loader