आपल्या दमदार अभिनयाने आणि विनोदी शैलीने रसिकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करणारे अभिनेते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. विनोदाचे अचूक टायमिंग असणारे लक्ष्यामामा हे मराठी सिनेरसिकांच्या गळ्यातील ताईत आहेत. आज लक्ष्मीकांत बेर्डे यांचा ६९वा वाढदिवस आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. लाडक्या लक्ष्यामामांच्या वाढदिवसानिमित्ताने ‘एक होता विदूषक’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा एक किस्सा जाणून घेणार आहोत.
हेही वाचा – लक्ष्मीकांत बेर्डेंच्या वाढदिवसानिमित्ताने लेकीने शेअर केली भावुक पोस्ट; म्हणाली, “तुमची…”
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या संपूर्ण कारकिर्दीत ‘एक होता विदूषक’ हा चित्रपट उजवा ठरला, असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही. या चित्रपटात त्यांनी साकारलेली सोंगाड्या (आबुराव) ही भूमिका मनाला चटका लावून जाणारी होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एक घटना घडली होती. त्याचा किस्सा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ‘दूरदर्शन सह्याद्री’च्या मुलाखतीमध्ये सांगितला होता.
हेही वाचा – Laxmikant Berde Birthday: मी आलो.. मी पाहिलं.. मी लढलो.. मी जिंकून घेतलं सारं
लक्ष्मीकांत म्हणाले, “साताऱ्यातल्या एका नदीगाठी एका चित्रपटाच चित्रीकरण होतं. मी नवीन गाडी घेऊन तिकडे गेलो होतो. हे ‘एक होता विदूषक’ या चित्रपटाचं चित्रीकरण होतं. जब्बार पटेलने मुद्दाम चित्रीकरणाची जाहिरात दिली होती. कारण त्याला प्रेक्षक मोठ्या प्रमाणात पाहिजे होते. चित्रपटातला तो सीनही तसाच होता. मी स्टार झालेला असतो आणि त्यावेळेस मी आईचं १०वं करण्यासाठी आलो असतो. तेव्हा संपूर्ण लोकं मला बघायला आलेले असतात. असा तो सीन आहे. यावेळेस इतक्या गाड्या होत्या, त्यामध्ये माझी गाडी होती. मी गाडीत बसलो तेव्हा लोकं गाडीवर चढायला लागले आणि जोरजोरात गाडीवर मारायला लागले. मी खाली उतरलो अन् म्हटलं, ही घ्या चावी. तोडून टाका. ही गाडी माझी नाहीये, तुमच्याच पैशावर घेतलेली गाडी आहे. त्याच्यानंतर दोन-तीन दादा चला, चला बाजूला व्हा, लक्ष्मीकांत तुम्ही जा, असं म्हणाले.”
हेही वाचा – Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ताबरोबर घडणार ‘ही’ वाईट गोष्ट, पाहा व्हिडीओ
दरम्यान, ‘एक होता विदूषक’ या चित्रपटात लक्ष्मीकांत यांच्या व्यतिरिक्त मधु कांबीकर, पूजा पवार, वर्षा उसगावकर, निळू फुले, मोहन अगाशे, निळू फुले अशा बरेच दिग्गज कलाकार मंडळींनी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती.