‘पद्मश्री’ आणि ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सन्मानित ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी आजवर ‘पांडू हवालदार’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘आम्ही सातुपते’, ‘साडे माडे ३’, ‘नवरा माझा नवसाचा’ अशा अनेक मराठी चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनांवर राज्य केले. केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी प्रेक्षकांनाही त्यांनी आपल्या अभिनयानं वेड लावलं आहे.
अशातच आता ते एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत आणि हा चित्रपट म्हणजे ‘अशी ही जमवा जमवी (Ashi Hi Jamawajami). या चित्रपटात अशोक सराफ यांच्यासह अभिनेत्री वंदना गुप्तेही आहेत. त्याशिवाय चैत्राली गुप्ते, सुनील बर्वे, मिलिंद फाटक, सुलेखा तळवलकर, पुष्कराज चिरपुटकर आणि नवोदित कलाकार तनिष्का विशे व ओमकार कुलकर्णी हे कलाकारही आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.
‘अशी ही जमवा जमवी’मध्ये अशोक सराफ असल्याने साहजिकच सेटवर मजा-मस्तीचं वातावरण असणार आणि याचीच खास झलक सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक लोकेश गुप्ते यांनी अशोक सराफ यांच्या सेटवरील मजा-मस्तीचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून चित्रीकरणादरम्यान अशोक सराफांचा सहकलाकारांबरोबरचा खास बॉण्ड दिसून येत आहे.
लोकेश यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये अशोक सराफ व चैत्राली गुप्ते यांचा एकत्र सीन असून, दोघांमधील संवादात झालेली मजामस्ती आणि मस्करी या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. त्याशिवाय लोकेश यांनी हा व्हिडीओ शेअर करीत असं म्हटलं आहे, “हसत-खेळत काम करण्याची मजा काही वेगळीच असते आणि त्यात अशोकमामांसारखा कलाकार असेल, तर काही विचारायलाच नको.”
राजकमल एंटरटेन्मेंट प्रस्तुत, लोकेश गुप्ते लिखित व दिग्दर्शित ‘अशी ही जमवा जमवी’ या चित्रपटातून फक्त तरुणांचीच नाही, तर वृद्ध मित्र-मैत्रिणींचीसुद्धा एक धमाकेदार कहाणी अनुभवायला मिळणार आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला असून, अशोक सराफ आणि वंदना गुप्ते या दोन दिग्गज कलाकारांची मजेदार जुगलबंदी त्यात पाहायला मिळत आहे.
दरम्यान ‘अशी ही जमवा जमवी’ चित्रपट १० एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. आता अशोक सराफ यांची ही नवीन भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का, तसेच वंदना गुप्ते व अशोक सराफ यांची जोडी काय कमाल करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.