खासदार आणि प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचा ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याच्या लाल किल्ल्यातून झालेल्या सुटकेच्या थरार यात पाहायला मिळत आहे. या चित्रपटाद्वारे क्रूर औरंगजेबाने केलेला कपटीपणा आणि छत्रपती शिवरायांनी बुद्धीचातुर्य जोरावर आग्र्याहून केलेली स्वत:ची सुटका या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होता येणार आहे. या निमित्ताने ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटाच्या टीमने ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’ला हजेरी लावली. यावेळी अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, यतीन कार्येकर आणि अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांनी या चित्रपटाबद्दल मनसोक्त गप्पा मारल्या.
“अब हिंदू ही हिंदू को काटेगा…” या औरंगजेबच्या वाक्याने सुरुवात होणाऱ्या ट्रेलरमुळे प्रत्येकाच्या अंगावर एकच काटा येतो. औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांना त्याच्या जन्मतिथीचे आमंत्रण देतो. छत्रपती शिवरायांना त्यांची जागा दाखवून देण्याचा हुकुम एका सरदाराला देतो. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाला भेटायला आल्यावर तेथे काय काय नाट्यमय घडामोडी घडतात, या सर्वांचा थरार आपल्याला चित्रपटात पाहता येणार आहे. त्यावेळी शूटींगदरम्यान पडद्यावर आणि पडद्यामागे काय गंमतीजमती घडल्या? या चित्रपटाची कथा कशी सुचली? छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचा इतिहास यात नवीन काय पाहायला मिळणार? याबद्दल या चित्रपटाच्या टीमने ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’ दरम्यान खुलासा केला.
दरम्यान आज विजयादशमीच्या शुभ मुर्हुतावर ५ ऑक्टोबरला ‘शिवप्रताप गरुडझेप’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची निर्मिती, लेखन आणि अभिनय अशी तिहेरी जबाबदारी डॉ. अमोल कोल्हे यांनी पेलली आहे. या चित्रपटात अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराज, ज्येष्ठ अभिनेते यतीन कार्येकर हे मोगल बादशाह औरंगजेब आणि अभिनेत्री मनवा नाईक ही छत्रपती शिवाजी महाराज यांची पत्नी सोयराबाई मोहिते या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ‘जगदंब क्रिएशन’ आणि डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे. तर दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे.