Madhuri Dixit : मराठी कलाविश्वात सध्या हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे. हा सिनेमा आज ( २४ जानेवारी ) सर्वत्र प्रदर्शित झालेला आहे. प्राजक्ता माळी, अमृता खानविलकर, गायत्री दातार, आदित्य सरपोतदार, सायली संजीव, लोकेश गुप्ते यांच्यासह अनेक मराठी कलाकारांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा असं आवाहन मराठी प्रेक्षकांना केलेलं आहे. मात्र, आणखी एका खास अभिनेत्रीने ‘फसक्लास दाभाडे’ सिनेमाचं कौतुक करत पोस्ट शेअर केली आहे. ती म्हणजे बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित. अभिनेत्री या सिनेमाबद्दल नेमकं काय म्हणालीये, जाणून घेऊयात…
बॉलीवूडमध्ये ९० चं दशक गाजवणारी सुपरस्टार अभिनेत्री म्हणून माधुरी दीक्षितला ओळखलं जातं. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. नुकतीच माधुरीने शेअर केलेली इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत आली आहे. यामध्ये अभिनेत्रीने हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ सिनेमाचं कौतुक केलं आहे. सिद्धार्थ चांदेकरला टॅग करत तिने संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
माधुरी दीक्षितची खास पोस्ट
“सिद्धार्थ चांदेकर व टीम तुम्हा सर्वांचं या नव्या चित्रपटासाठी खूप खूप अभिनंदन! ही हृदयस्पर्शी कथा प्रेक्षकांसमोर आणल्याबद्दल खूप खूप आभार. हा सुंदर अनुभव घेण्यासाठी तुमच्या जवळच्या सिनेमागृहात जाऊन ‘फसक्लास दाभाडे’ नक्की पाहा आणि ‘फसक्लास’ अनुभव घ्या!” असं माधुरी दीक्षितने तिच्या स्टोरीमध्ये म्हटलं आहे.
या पोस्टसह धकधक गर्लने चित्रपटाचं पोस्टर देखील शेअर केलं आहे. सिद्धार्थ चांदेकरने ही स्टोरी रिशेअर करत, “खूप खूप धन्यवाद MD” असं म्हणत अभिनेत्रीचे ( Madhuri Dixit ) आभार मानले आहेत.
दरम्यान, ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाबद्दल बद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, राजसी भावे, निवेदिता सराफ, हरीश दुधाडे, राजन भिसे, उषा नाडकर्णी आणि मिताली मयेकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमात प्रेक्षकांना दाभाडे कुटुंबीयांची गोष्ट पाहायला मिळणार आहे. आता ‘फसक्लास दाभाडे’ प्रेक्षकांच्या मनावर काय जादू करणारह हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.