अभिनेत्री माधुरी दीक्षितची निर्मिती असलेला ‘पंचक’ चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाद्वारे कोकणातील खोत कुटुंबाची गोष्ट उलगडण्यात आली आली आहे. सध्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच निमित्ताने बॉलीवूडच्या धकधक गर्लने नुकताच इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधला. यावेळी चित्रपटाची निर्मिती, मराठी चित्रपट व त्यांची गोष्ट याबाबत अभिनेत्रीने आपलं मत मांडलं.
माधुरी दीक्षितची निर्मिती असलेल्या ‘पंचक’मध्ये विद्याधर जोशी, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, आदिनाथ कोठोर अशी बऱ्याच दिग्गज कलाकारांची फौज आहे. या चित्रपटासाठी कास्टिंग करताना माधुरीने निर्माती म्हणून स्वत: पुढाकार घेतला होता. चित्रपटाच्या स्क्रिप्टबद्दल माधुरी सांगते, “जेव्हा पहिल्यांदा मी ही कथा ऐकली तेव्हा मला हा विषय फारच वेगळा वाटला. मी या विषयावरील एकही चित्रपट यापूर्वी पाहिला नव्हता. ‘पंचक’ हा अंधश्रद्धेवर आधारलेला नसून मृत्यूच्या भीतीने घरात कसे प्रसंग घडतात याला चित्रपटात विनोदी स्वरुपात मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.”
हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौघुलेंना चाहत्याकडून मिळालं खास गिफ्ट! अमिताभ बच्चन यांचा उल्लेख करत म्हणाले…
माधुरीला अंधश्रद्धेबद्दल विचारलं असता ती म्हणाली, “मी अजिबात अंधश्रद्धाळू नाही पण, दैनंदिन जीवनात त्यासंबंधित अनेक गोष्टी आपण करत असतो. ‘ये अच्छा हो गया’ असं कोणी म्हटलं की, मी पटकन टचवूड म्हणते किंवा बोटे मोडते. बारावीची परीक्षा देताना मी सगळ्या पेपरसाठी एकच शर्ट घातला होता. माझा पहिला पेपर चांगला गेला…मग मला वाटलं हा माझा लकी शर्ट आहे म्हणून पुढच्या पेपरला मी पुन्हा तोच शर्ट घातला. त्यानंतर तेच शर्ट परिधान करून एक पेपर मला साधारण बरा गेला…फारसा चांगला गेला नाही. तेव्हा माझी आई मला म्हणाली होती की, लकी शर्ट वगैरे काही नसतं. तुम्ही किती प्रयत्न करता ते महत्त्वाचं असतं. तिचा तो सल्ला मला आजतागायत आठवत आहे.”
दरम्यान, माधुरी दीक्षतच्या ‘पंचक’ चित्रपटात आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, तेजश्री प्रधान, आनंद इंगळे, सतीश आळेकर, भारती आचरेकर, आरती वडगबाळकर, नंदिता पाटकर, गणेश मयेकर, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आशिष कुलकर्णी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.