Maharashtra Election 2024 : आज संपूर्ण राज्यभरात मतदान प्रक्रिया सुरू आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केलं जात आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून ६ वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरू असणार आहे. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. या दोन्ही सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री गिरीजा ओकने आपलं कर्तव्य पार पाडलं आहे. न्यूझीलंडहून प्रवास करून गिरीजाने पुण्यात मतदान केलं आहे.
अभिनेत्री गिरीजा ओक मतदान केल्यानंतर म्हणाली, “मी मतदान केलं, असं लोक आजकाल एकमेकांना सांगतात. कारण इतर लोकं करत नाहीत. मला असं वाटतं, वेगळी काहीच गोष्ट नाही. प्रत्येकाने मतदान करायलाच हवं. मी आज न्यूझीलंडहून ३२ तास प्रवास करून भारतात आले. त्यानंतर पुन्हा चार-पाच तासांचा प्रवास करून पुण्यात येऊन मतदानाला आले.”
पुढे गिरीजा ओक म्हणाली की, प्रत्येकाची हीच अपेक्षा असते नेत्यांनी जी आश्वासने दिली आहेत, ती त्यांनी पूर्ण करावीत. मी ज्या विभागात राहते, तिथल्या सगळ्यांचं उमेदवारांबद्दल मला बऱ्यापैकी माहीत आहे. त्यामुळे माझा मतदान करण्याचा निर्णय खूप क्लिअर होता. पण, मतदानाची टक्केवारी खूप दुःखद आहे. ऐरवी हे बरोबर नाही ते बरोबर नाही हे बोलायला आवडतं. पण, मतदानाचा हक्क बजावला नाही तर बोलण्याचा हक्क आपल्याला नसून शकतो. तर मला असं वाटतं मतदानाचा हक्क आपण प्रत्येकाने बजावलाच पाहिजे. कारण त्याला पर्याय नाहीये. या दिवशी खूप प्रेमाने ट्रीप प्लॅन करतात. हे मला अजिबात पटतं नाही. पण, याबद्दल लोकांना कसं सांगावं कळतं नाही. मी म्हटलं तसं ३२ ते ३६ तास प्रवास करून मी मतदानाला आले. मतदानासाठी काहीच कारण द्यायला नाही पाहिजे. तुम्ही मतदान करायलाच पाहिजे.
हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ मालिका का लांबवली? रुपाली भोसलेने सांगितलं यामागचं सत्य, म्हणाली, “आमचा विचार न करता…’
दरम्यान, राज्यातील २८८ विधानसभेच्या जागांसाठी मतदान होतं आहे. महायुती, महाविकास आघाडी या दोन युत्यांसह अनेक पक्ष विधानसभा निवडणुकीच्या मैदानात आहेत. या अनेक पक्षातील एकूण ४ हजार १३६ उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. पुढीच पाच वर्षांसाठी सत्तेच्या चाव्या मतदार कोणाच्या हाती देणार हे २३ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.