‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. शाहीर साबळे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे, तर अभिनेता अंकुश चौधरी याने या चित्रपटात शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. सना शिंदे व अश्विनी महांगडे या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकांत दिसत आहेत. तर या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता या चित्रपटातील एका अभिनेत्याची पोस्ट खूप चर्चेत आली आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन, संवाद, गाणी, सर्व कलाकारांचा अभिनय हे सर्वच प्रेक्षकांना खूप आवडले आहे. अंकुश, सना आणि अश्विनी यांच्याशिवाय या चित्रपटात राजा मयेकर, बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनीही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटात अभिनेता दुष्यंत वाघ याने बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारली आहे. आता त्याने या भूमिकेसाठी तयारी करतानाचा एक व्हिडीओ शेअर करीत खास पोस्ट लिहिली आहे.
दुष्यंतने त्याच्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला. यात तो ही भूमिका साकारण्यासाठी तयार होताना दिसत आहे. तर याच व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे तरुणपणीचे फोटोही त्याने शेअर केले आहेत. हा व्हिडीओ पोस्ट करीत त्याने लिहिले आहे, “दुष्यंत ते बाळासाहेब हा प्रवास… रोज सेटवर गेल्यानंतर व्यक्तिरेखा बनणे हा प्राथमिक भाग…आमची मेकअप टीम कामाला लागायची अन् प्रत्येक कलाकार भूमिकेप्रमाणे दिसायला लागायचा. पण त्यामागचा अभ्यास, मेहनत, निष्ठा आणि कलाकारी तुम्हाला कळावी म्हणून हा व्हिडीओ.”
पुढे त्याने लिहिले, “मी बाळासाहेबांसारखं दिसणं हे श्रेय सर्वस्वी जगदीश येरेचं आहे…खूप खूप प्रेम आणि खूप खूप आभार .. तुझ्याशिवाय हे शक्य नव्हतं. तर आतीश हा सेटवर मेकअपची काळजी घेणे ह्याशिवाय एक कमाल मित्र, एक सच्चा माणूस आणि आपल्या गप्पांचा कट्टा.. . मी आजही मिस करतो. लवकरच भेटू….तर इतकी मेहनत घेऊन बनवला आहे आम्ही…महाराष्ट्र शाहीर…” आता त्याची ही पोस्ट खूप चर्चेत आली असून यावर कमेंट्स करीत त्याचे चाहते त्याचे काम आवडल्याचे सांगत आहेत.