‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये विविध प्रकारची पात्रं साकारून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव होय. तिने अनेक नाटकं व चित्रपटांमध्येही काम केलं आहे. लवकरच तिचा ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नम्रताने नुकतीच एक मुलाखत दिली, या मुलाखतीत तिने तिच्या वडिलांना पहिल्यांदा रडताना पाहिलं, तो प्रसंग सांगितला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नम्रता संभेरावने सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिच्या अभिनय करण्याला वडिलांचा नकार होता असा खुलासा तिने केला. नम्रता म्हणाली, “माझं मी ठरवलं होतं की मला आयुष्यात हेच करायचं आहे. पप्पांचा नकार असला तरी ते असं नाही म्हणायचे की तू जायचंच नाही, तू करायचंच नाही. ठीक आहे करतेय तर असं होतं.”

Video: “मी असं कृत्य…”, सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याला मारल्याबद्दल नाना पाटेकरांनी मागितली माफी, म्हणाले…

पुढे नम्रता म्हणाली, “एकदा वांगणीला एक स्पर्धा होती आणि रात्री खूप उशीर होणार होता. जाताना मी टीमबरोबर गेले, मग पप्पांना म्हटलं रात्री यायला खूप उशीर होणार आहे, तर तुम्ही मला न्यायला याल का? तर ते जरा लवकरच आले. त्या दिवशी त्यांनी मला काम करताना मंचावर पहिल्यांदा पाहिलं. तेव्हा त्यांचे अक्षरशः डोळे भरून आले. त्यादिवशी मला पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं बक्षीस मिळालं, ते त्यांनी पाहिलं. मंचावर माझ्या मुलीचं नाव पुकारत आहेत, हे पाहून वडिलांना भरून आलं. तेव्हा पहिल्यांदा मी माझ्या पप्पांना रडताना पाहिलं होतं.”

आयुष्यात कोणतंही काम करायचं असेल तर आपल्या पालकांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे, असं नम्रता सांगते. “आपल्या आई-वडिलांचा पाठिंबा असणं खूप गरजेचं असतं. त्यांचा पाठिंबा नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. अशी कित्येक उदाहरणं मी माझ्या आजूबाजूला बघितली आहेत,” असं ती म्हणाली.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasya jatra fame namrata sambherao father cried when she got best actress prize hrc
Show comments