प्रवीण तरडे लिखित आणि स्नेहल तरडे दिग्दर्शित ‘फुलवंती’ चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. अजूनही या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून साकारलेली ‘फुलवंती’ ही अलौकिक कलाकृती चित्रपटरुपात पाहायला मिळत आहे. पेशवाई काळातील ‘फुलवंती’ नावाची सुप्रसिद्ध नर्तिका आणि प्रकांडपंडीत व्यंकटशास्त्री यांची दमदार कथा असलेली, देखण्या कलाविष्काराने सजलेली ‘फुलवंती’ प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडला आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळीने ‘फुलवंती’ची भूमिका साकारली आहे. तर अभिनेता गश्मीर महाजनी व्यंकटशास्त्रीच्या भूमिकेत झळकला आहे. याचित्रपटाच्या कथेसह गाण्यांनी देखील प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. त्यामुळे अजूनही चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या सेटवरही ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. याचा व्हिडीओ अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हेही वाचा – ‘अबीर गुलाल’ मालिका बंद होणार असल्याचं कळताच अक्षय केळकरला बसला धक्का, म्हणाला, “मला पुन्हा स्ट्रगल…”
अमेरिका दौरा झाल्यानंतर आता पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांचा खळखळून हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अवलीय कलाकार सज्ज झाले आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या कार्यक्रमातील कलाकार सेटवरील मजा-मस्तीचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. अशातच प्राजक्ता माळीने देखील सेटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये पृथ्वीक प्रतापसह हास्यजत्रेतील वादक अमीर हडकर ‘फुलवंती’ चित्रपटाचं कौतुक करताना दिसत आहेत.
पृथ्वीक प्रताप म्हणतो, “मला फुलवंती पेक्षा जास्त फुलवंतीची मीरा होतं असताना आवडलं.” तसंच हास्यजत्रेतील वादक अमीर हडकर म्हणाले, “मला आधी वाटलं फुलवंती ही लावणीवाली वगैरे आहे. पण फुलवंती कलाकार आहे.” हे ऐकून प्राजक्ता म्हणाली की, वा दादा वा…
दरम्यान, अभिनेत्री प्राजक्ता माळीने ‘फुलवंती’ या चित्रपटाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. या नव्या प्रवासाबद्दल बोलताना प्राजक्ता म्हणाली होती, “‘फुलवंती’ सारखी दर्जेदार साहित्यकृती माझ्याकडे आल्याने मी निर्माती म्हणून एक भव्य कलाकृती करण्यास तयार झाले. यासाठी पॅनोरमा स्टुडिओजने मला भक्कम पाठिंबा दिला, त्यातून माझा आत्मविश्वास उंचावला. ‘फुलवंती’ चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांना उत्तम कलाकृती देऊ शकेन, असा विश्वास मला आहे. दर्जेदार संहिता आणि उत्तम कलावंत यामुळे चित्रपटाच्या बरोबर आम्ही भक्कमपणे उभे असल्याचे पॅनोरमा स्टुडिओजचे मॅनेजिंग डिरेक्टर कुमार मंगत पाठक यांनी सांगितले.”
© IE Online Media Services (P) Ltd