Samir Choughule shares Anecdote: अभिनेता समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, सई ताम्हणकर या कलाकारांच्या प्रमुख भूमिका असलेला गुलकंद हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सगळ्यात अभिनेता समीर चौघुले यांनी एका मुलाखतीत केलेले वक्तव्य सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
समीर चौघुले यांनी नुकतीच ‘अजब गजब’ पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत समीर चौघुले म्हणाले की, एक काळ असा होता की, काही निर्मात्यांनी आम्हाला चांगली वागणूक दिली नाही. आम्हाला अक्षरश: गाईच्या गोठ्यात उतरवलेलं होतं. अशा अनेक निर्मात्यांकडे कामं केलेली आहेत. प्रत्येक निर्माता चांगला असतो, असं नाही. पण, या सगळ्यातून शिकत गेलो.
आयुष्यात काय चुकतंय…
समीर चौघुले त्यांच्या संघर्षाच्या काळातील आठवण सांगत म्हणाले, “मी मध्यंतरी एक चित्रपट केला होता. २००६-०७ ला त्या चित्रपटाचे शूटिंग चालू होते. त्या वेळेला समीर चौघुले काहीच नव्हता. मी संघर्ष करीत होतो. आयुष्यात काय चुकतंय कळत नव्हतं. त्या वेळेला आता जे माझे समवयस्क कलाकार आहेत, त्यांना व्हॅनिटी व्हॅन होती. व्हॅनिटी व्हॅनवर त्यांचं नाव होतं.”
“मला आणि माझ्यासारख्या काही इतरांना एका शाळेच्या वर्गात उभं केलं होतं. त्या वेळेला मला असं वाटलं की, माझं नाव व्हॅनिटी व्हॅनवर कधी लागेल? क्षणभर मी त्या व्हॅनिटी व्हॅनच्या दाराकडे बघितलं. तुम्हाला चहा पाहिजे का वगैरे हे त्यांना सगळे विचारत होते. आम्हाला कोणी विचारत नव्हतं. आम्ही उघड्यावरती चेंज करीत होतो.”
पुढे समीर चौघुले म्हणाले, “मी स्वत:ला समजावलं की, त्या पातळीला जाईपर्यंत तू कुठेतरी कमी पडत आहेस. ती त्यांची चूक नाहीये, तुझी चूक आहे. तू असं काहीही काम केलेलं नाहीयेस की, त्यांच्या नजरेत तू यावास. म्हणजे मग काय पर्याय आहे की, तू चांगलं काम केलं पाहिजेस. हे मला स्वत:ला प्रेरणा दिल्यासारखं वाटलं. आज मी नायक म्हणून एका चित्रपटात काम करीत आहे.”
दरम्यान, समीर चौघुले यांना महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमांतून प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. आज घराघरांत समीर चौघुले पोहोचले असून ते त्यांच्या त्याच्या निखळ विनोदाने प्रेक्षकांना हसवताना दिसतात. आता ते चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘गुलकंद; हा सिनेमा १ मे २०२५ ला प्रदर्शित होणार आहे.