छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने अनेक नवोदित कलाकारांना ओळख निर्माण करून दिली. आता हे कलाकार मराठीसह हिंदीत काम करताना दिसत आहेत. तसंच नवनवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. त्यापैकी एक म्हणजे शिवाली परब. ‘महाराष्ट्राची क्रश’, ‘कल्याणची चुलबुली’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाली परबचा लवकरच नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यामुळे शिवाली सध्या खूप चर्चेत आली आहे.
अभिनेत्री शिवाली परबच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘मंगला’ असं आहे. १७ जानेवारीला शिवालीचा हा नवा चित्रपट प्रदर्शित होतं आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या ‘मंगला’ चित्रपटात शिवालीसह अलका कुबल, शशांक शेंडे महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे सध्या शिवाली, अलका कुबल आणि शशांक शेंडे विविध एंटरटेनमेंट माध्यमांशी संवाद साधताना दिसत आहे.
नुकताच ‘मंगला’ चित्रपटानिमित्ताने शिवाली परबने ‘राजश्री मराठी’शी संवाद साधला. यावेळी तिने ‘मंगला’ चित्रपटाचा ट्रेलर बॉलीवूडच्या कलाकार पाठवल्याचं सांगितलं. शिवाली म्हणाली, “मी या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. कारण अशा पद्धतीचा माझा हा पहिलाच चित्रपट आहे. वेगळा चित्रपट आहे. आताच आमचा ट्रेलर आलाय. मी संजय दत्त, श्रद्धा कपूर, शाहरुख खान, सलमान खान या सगळ्यांना इन्टाग्रामवर ट्रेलर पाठवून दिलाय. मला माहित नाही, ते कधी बघितलं, नाही बघितलं. पण माझं असं झालं पाठवून देते.”
पुढे शिवाली परब म्हणाली, “आपले मराठी अभिनेते सयाजी शिंदे सर त्यांनाही मी इन्स्टाग्रामवर ट्रेलर पाठवला होता. साधारण दोन-अडीच तासांनी त्यांनी मेसेज बघून मला प्रत्युत्तर दिलं. खूप सुंदर ट्रेलर झाला. आशादायक वाटला. खूप खूप शुभेच्छा. तुला या सिनेमासाठी खूप पुरस्कार मिळो, असा मेसेज केला. त्यामुळे माझीच उत्सुकता द्विगुणित झाली आहे. मी रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, जॅकी चॅनला यांनादेखील ‘मंगला’ चित्रपटाचा ट्रेलर पाठवला आहे.” शिवालीने हे सांगितल्यावर अलका कुबल यांना हसू अनावर झालं.
हेही वाचा – Bigg Boss 18: महाअंतिम सोहळ्याच्या चार दिवसाआधी झालं मिड वीक एविक्शन, ‘ही’ मराठमोळी सदस्य झाली घराबाहेर
दरम्यान, शिवाली परबचा कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाबरोबर इतर काम लीलया सांभाळत आहे. आता तिने मराठी रंगभूमीवर पाऊल ठेवलं आहे. प्रसाद खांडेकर लिखित, दिग्दर्शित ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकाच्या माध्यमातून शिवाली नाट्य क्षेत्रात पदार्पण केलं आहे. या नाटकात शिवालीसह प्रसाद खांडेकर, ओंकार राऊत, भक्ती देसाई, प्रथमेश शिवलकर आणि नम्रता संभेराव पाहायला मिळत आहेत.