महेश मांजरेकर हे मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. मराठीबरोबर मांजरेकरांनी अनेक हिंदी चित्रपटही दिग्दर्शित केले आहेत. महेश मांजरेकरांचा मुलगा सत्या मांजरेकरही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात करिअर करत आहे. याबरोबरच सत्याने नुकतंच नवा व्यवसायही सुरू केला आहे. सत्याने काही दिवसांपूर्वी हॉटेल व्यवसायात पाऊल ठेवलं आहे.
सत्याने सुका सुखी नावाने हॉटेल सुरू केलं आहे. त्याच्या हॉटेलमध्ये मालवणी पद्धतीचे सुके मासे चाखायला मिळणार आहे. मराठी अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी सत्याच्या हॉटेलमधून काही पदार्थ ऑर्डर केले होते. त्यांनी सुकी करंदी, काळं चिकन, सोलकढी हे पदार्थ ऑर्डर केले होते. सत्याच्या हॉटेलमधील पदार्थांची चव चाखल्यानंतर नीना कुळकर्णींनी सोशल मीडियावर पोस्टही केली होती. त्यानंतर आता महेश मांजरेकरांनी सत्याच्या हॉटेलमधील हे पदार्थ कुठे व कसे बनवले जातात, याबाबत माहिती दिली आहे.
सुका सुखीच्या इन्स्टाग्राम पेजवरुन महेश मांजरेकरांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. “सुका सुखी हे हॉटेल आम्ही सुरू केलं आहे. इथे अस्सल मालवणी पदार्थांची चव चाखायला मिळेल. माझ्या घरी जे जेवण बनतं, ते मला लोकांना द्यायचं होतं. मी बऱ्याच ठिकाणी फिरलो, पण घरच्यासारखं जेवण फार कमी ठिकाणी मिळालं. म्हणून हे हॉटेल सुरू केलं. सुका सुखीमध्ये बनवले जाणारे सगळे पदार्थ माझ्या घरातून येतात. मसाल्यांपासून ते तेलापर्यंत जे माझ्या घरी बनतं, तेच सुका सुखीमध्ये मिळतं,” असं महेश मांजरेकर म्हणाले.
दरम्यान, महेश मांजरेकर ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा ऐतिहासिक चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. याबरोबरच उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे, विशाल निकम आदि कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.