Mahesh Manjrekar on Salman Khan: महेश मांजरेकर लवकरच ‘देवमाणूस’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात रेणुका शहाणे त्यांच्याबरोबर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे या दिग्गज कलाकारांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

महेश मांजरेकर काय म्हणाले?

नुकताच महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांनी ‘तारांगण’शी संवाद साधला. त्यावेळी महेश मांजरेकरांना विचारण्यात आले की, तुमच्या आयुष्यातील देवमाणसं कोण आहेत? यावर बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, “ज्यांच्यामुळे मी घडलो, असे खूप लोक आहेत. मी त्यांच्यामुळे आज या क्षेत्रात आहे. त्यामुळे मला त्यांच्याप्रति आदर आहे. पण, मी त्यांना देवमाणसं म्हणणार नाही.”

“माझ्या आयुष्यातील देवमाणसं दोन आहेत. सलमान खान आणि शिवाजी साटम ही दोन देवमाणसं आहेत. माझ्यासाठी ती कायम देवमाणसं राहतील. मला आठवतं की, एकदा मी वाईट काळातून जात होतो. घरात बसलो होतो. काय करायचं, हा विचार होता. कोणीतरी दरवाजा वाजवला. शिवाजी साटमचा मुलगा आला. म्हणाला की, पप्पांनी पाठवलं. मी विचारलं का? पार्सल पाठवलं आहे. त्याने माझ्यासाठी दोन लाख रुपये पाठवले होते. त्यावेळी मला पैशांची खूप गरज होती. मी शिवाजीला विचारलं की, तुला कसं माहीत? तर तो म्हणाला की, मला माहीत आहे. मला अजूनही माहीत नाही की, त्याला माझी समस्या कशी कळली”.

सलमान खानविषयी महेश मांजरेकर म्हणाले, “एकदा ऑफिसमध्ये बसलो होतो. मी खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये होतो, काळजीत होतो. सलमान खानचा फोन आला. तो मला म्हणाला की काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. तेव्हा तो आणि मी एकत्र कामही करीत नव्हतो. तो इंडस्ट्रीमध्ये आणि मी इंडस्ट्रीमध्ये आहे, एवढीच आमची ओळख होती. “

तर रेणुका शहाणे इंडस्ट्रीमधील देवमाणसं कोण आहेत? यावर बोलताना म्हणाल्या, “अजीज मिर्झा यांना मी माझं मेन्टॉर मानते. त्यांचं व्यक्तिमत्त्व हे अगदी देवमाणसासारखंच आहे. त्यांची संतवृत्ती आहे. दुसरे म्हणजे बडजात्या कुटुंब हे माझ्यासाठी देवमाणसं आहेत. सुरजजी, राजबाबूजी आणि त्यांच्या पत्नी सुधाजी ही माझ्यासाठी देवमाणसं आहेत.”

दरम्यान, देवमाणूस हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ ला प्रदर्शित होणार आहे.