‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे ओंकार भोजने घराघरांत प्रसिद्ध झाला. या लोकप्रिय कार्यक्रमातून भोजनेने अचानक एक्झिट घेतल्याने त्याच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला होता. यानंतर त्याने अनेक चित्रपट, विविध सीरिजमध्ये काम केलं. ओंकार सध्या ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. याशिवाय तो महेश मांजेकरांची निर्मिती असलेल्या ‘करून गेलो गाव’ या नाटकात मुख्य भूमिका साकारत आहे. आता लवकरच ओंकार भोजने आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. मांजरेकरांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी खुलासा केला.
अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी अलीकडेच ‘राजश्री मराठी’च्या मुलाखतीला हजेरी लावली होती. यावेळी मांजरेकरांनी त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, “माझ्या एका प्रचंड आवडीच्या विषयावर मी सुबोध, उपेंद्र आणि गौरी यांना घेऊन एक चित्रपट केला आहे. पण, त्या चित्रपटाचं नाव मी सध्या उघड करणार नाही. याशिवाय मी आणखी एक प्रयोगशील चित्रपट केला आहे त्यात ओंकार भोजनेने काम केलंय पण, त्याच्याशिवाय त्या चित्रपटात कोणीही नाही.”
महेश मांजरेकर पुढे म्हणाले, “त्या अख्ख्या चित्रपटात ओंकार भोजने एकटाच आहे. जवळपास १ तास ४० मिनिटं तो एकटाच बोलत आहे त्याच्याशिवाय त्यामध्ये कोणीच नाहीये. अभिनेत्री, सहकलाकार कोणीच नाही फक्त ओंकार भोजने एकटाच! त्या चित्रपटाचं संपूर्ण शूटिंग आता पूर्ण झालेलं आहे आणि मी त्याचं नाव ‘राजामौली’ असं ठेवलंय.”
हेही वाचा : १०३ ताप, लाल डोळे घेऊन त्रिशा ठोसरने दिली होती ‘नाळ २’साठी ऑडिशन; आईने सांगितला ‘तो’ किस्सा
“‘राजामौली’ हा चित्रपट पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये प्रदर्शित होईल” असा खुलासा महेश मांजरेकरांनी केला आहे. दरम्यान, चित्रपटात ओंकार भोजनेबरोबर कोणतेही सहकलाकार नसल्याने या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे.