मराठीसह हिंदी सिनेविश्वातील एक लोकप्रिय व प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणजे महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar). ‘नटसम्राट’, ‘काकस्पर्श’, ‘लालबाग परळ’, ‘भाई व्यक्ती आणि वल्ली’, ‘कोकणस्थ’, ‘दे धक्का’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’ यांसारख्या अनेक मराठी व ‘वास्तव’, ‘काटे’, ‘जिस देस में गंगा रहता है’ तसंच ‘विरुद्ध’सारख्या अनेक हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. महेश मांजरेकरांनी आजवर आपल्या चित्रपटांमधून अनेक नव्या कलाकारांना संधी दिली आहे.
अभिनेता सिद्धार्थ जाधवलादेखील (Siddharth Jadhav) महेश मांजरेकरांनी आजवर अनेक नवनवीन भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. सिद्धार्थमधील अभिनेत्याची वेगळी बाजू प्रेक्षकांसमोर आणण्यात महेश मांजरेकरांचा मोठा वाटा आहे. याबद्दल स्वत: सिद्धार्थनेही अनेक मुलाखतींमधून भाष्य केलं आहे. सिद्धार्थ त्याच्या प्रत्येक मुलाखतीत महेश मांजरेकरांचं नाव घेत त्यांचं कौतुक करतो. अशातच महेश मांजरेकरांनी सिद्धार्थचं कौतुक केलं आहे.
महेश मांजरेकरांनी सिद्धार्थचं कौतुक करत तो माझा मुलगा असल्याचे म्हटलं आहे. लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असं म्हटलं की, “सिद्धार्थ जाधव हा खूपच उत्तम नट आहे. त्याच्यातील कौशल्याचा अजून ३० टक्केही वापर झालेला नाही. तो माझा फायदा आहे. तरीही मी म्हणतो की, तो माझाच मुलगा आहे. कारण मी त्याच्यासाठी काही केलं नाही; पण मी त्याला व्यवस्थित वापरुन घेतलं.”
यापुढे महेश मांजरेकरांनी असं म्हटलं की, “सिद्धार्थमधील योग्य ते गुण मी वापरले आणि आता तो निर्माता होत आहे याचा मला आनंद आहे. त्यात तो आई-वडिलांच्या नावाने संस्था काढत आहे. त्यात माझी मदत होणार असेल तर यापेक्षा अजून काय पाहिजे.” दरम्यान, ‘अॅनिमल’ या नवीन नाटकाच्या निमित्ताने सिद्धार्थ जाधव आणि महेश मांजरेकर १५ वर्षांनी पुन्हा एकदा रंगभूमीवर एकत्र काम करणार आहेत.
सिद्धार्थ जाधवच्या करिअरला २५ वर्षे पूर्ण झाली असून यानिमित्ताने त्याने निर्मिती क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. सिद्धार्थने आपल्या आई-वडिलांच्या नावाने स्वत:ची नाट्यनिर्मिती संस्था सुरू केली आहे आणि या संस्थेचं नाव ‘ताराराम प्रॉडक्शन्स’ असं आहे. या निर्मितीसंस्थे अंतर्गत ‘अॅनिमल’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शन व लेखन महेश मांजरेकर करणार आहेत.
काही दिवसांपुर्वी सिद्धार्थने त्याच्या या निर्मितीसंस्थेबद्दल सोशल मीडियाद्वारे माहिती दिली होती. ‘अस्तित्व’ नाटकाच्या पोस्टरसह “स्वप्नपूर्ती… ‘ताराराम’ आई-वडिलांच्या नावाने निर्मितीसंस्था… महेश मांजरेकर सरांच्या आशीर्वादाने नवीन नाटक… लवकरच…” अशी पोस्ट शेअर करत सिद्धार्थने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती.