Zapuk Zupuk And Devmanus Movie 2nd Day Box Office Collection : काही दिवसांपूर्वी दोन नवीन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणचा ‘झापुक झुपूक’ आणि महेश मांजरेकर, रेणुका शहाणे यांचा ‘देवमाणूस’, हे दोन चित्रपट २५ एप्रिलला प्रदर्शित झाले. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे. पण, बॉक्स ऑफिसवरील कमाईबद्दल बोलायचं झालं तर, ‘देवमाणूस’ चित्रपटापेक्षा ‘झापुक झुपूक’ चांगली कमाई करताना दिसत आहे. दोन दिवसांत या चित्रपटांनी किती कलेक्शन केलं? जाणून घ्या..

‘झापुक झुपूक’ हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. गेल्या वर्षी ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यात केदार शिंदेंनी ‘झापुक झुपूक’ चित्रपटाची घोषणा केली होती. सूरजला घेऊन एक चित्रपट करणार असून, या चित्रपटाचं नाव ‘झापुक झुपूक’ असणार, असं केदार शिंदे यांनी जाहीर केलं होतं. या चित्रपटात सूरज व्यतिरिक्त इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, जुई भागवत, दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी अशी तगडी कलाकार मंडळी झळकले आहेत.

सॅकनिल्क दिलेल्या आकडेवारीनुसार, सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात २४ लाखांची कमाई केली होती. तर जगभरात २७ लाखांचं कलेक्शन केलं होतं. तसंच दुसऱ्या दिवशी देखील ‘झापुक झुपूक’ चित्रपटाने २४ लाखांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे दोन दिवसांत सूरजच्या चित्रपटाने ४८ लाखांचं कलेक्शन केलं आहे.

तेजस प्रभास विजय देउस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’ हा चित्रपट २०२२ साली प्रदर्शित झालेल्या ‘वध’ या हिंदी चित्रपटावर आधारित आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणूका शहाणे व्यतिरिक्त सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके आणि अभिजीत खांडकेकर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचं पटकथा आणि संवाद लेखन हे अभिनेत्री नेहा शितोळे केलं आहे. ‘देवमाणूस’ चित्रपटाने पहिल्या दिवशी १४ लाखांची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कमाईमध्ये किचिंत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी १९ लाखांचं कलेक्शन केलं आहे. त्यामुळे दोन दिवसांत ‘देवमाणूस’ चित्रपटाने ३३ लाखांचा गल्ला जमवला आहे.