गेल्या काही दिवसांपासून बरेच कलाकार सध्याच्या मराठी सिनेसृष्टीबाबत खंत व्यक्त करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे यांनी मराठी सिनेसृष्टी ऑक्सीजनवर असल्याचं गंभीर विधान केलं होतं. त्यानंतर आता लोकप्रिय दिग्दर्शक, निर्माते, लेखक, अभिनेते महेश मांजरेकर यांनी मराठी सिनेसृष्टीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. “मराठी चित्रपट दिवसागणिक मागे-मागे जातोय,” असं महेश मांजरेकर म्हणाले.
नुकतेच महेश मांजरेकर आणि त्यांची पत्नी मेधा मांजरेकर यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘मटा कट्टा’वर उपस्थिती लावली होती. यावेळी महेश मांजरेकरांनी सध्याच्या मराठी चित्रपटांच्या परिस्थितीबाबत आपलं परखड मत व्यक्त केलं. महेश मांजरेकर नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या…
महेश मांजरेकर म्हणाले, “भारतीय सिनेव्यवसायाची मोठी बाजारपेठ महाराष्ट्र आहे. पण, तिकडेच मराठी चित्रपटाचं मूल्य शून्य आहे. मराठी सिनेसृष्टीत सर्वच ‘अभिमन्यू’ आहेत. चित्रपट कसा तयार करायचा हे त्यांना अचूक माहितीये, पण तयार केल्यानंतर तो प्रेक्षकांपर्यंत कसा पोहोचवायचा याचं ज्ञान नाही. त्यामुळे मराठी चित्रपट दिवसागणिक मागे-मागे जातोय. त्यात मराठी चित्रपटांचं बजेट तुटपुंज असतं आणि आपली स्पर्धा दोनशे कोटी निर्मितीमूल्य असललेल्यांशी होते.”
पुढे महेश मांजरेकर म्हणाले की, मी आता कमी बजेटचे चित्रपट करणार नाही, असं ठरवलं आहे. चार-पाच कोटी रुपये घेऊन अनेक निर्माते माझ्याकडे येतात. तुमचे हे पैसे वाचवा, असं मी त्यांना सांगतो. आता एका बिग बजेट मराठी चित्रपटाची प्रतीक्षा आहे, ज्यामुळे चित्रपटगृह भरेल; जो पुन्हा मराठी सिनेसृष्टीला उभं करेल. आपले सर्वच कलाकार- तंत्रज्ञ हे इतर कोणत्याही सिनेसृष्टीतल्या कलाकारांपेक्षा अव्वल आहेत.
दरम्यान, महेश मांजरेकरांच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘एक राधा एक मीरा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेता गश्मीर महाजनी आणि मृण्मयी देशपांडेची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. याशिवाय महेश मांजरेकरांचा २५ एप्रिलला ‘देवमाणूस’ नावाचा चित्रपट येत आहे. या चित्रपटात महेश यांच्यासह अभिनेत्री रेणुका शहाणे, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.