मानसी नाईक ही मराठी कलाविश्वातील उत्तम अभिनेत्री व नृत्यांगणा म्हणून ओळखली जाते. ‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्यामुळे तिने घराघरांत लोकप्रियता मिळवली. मानसीचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सोशल मीडियावर ती नेहमीच विविध व्हिडीओ, रील्स शेअर करत असते. याशिवाय अनेक सामाजिक मुद्द्यांवर अभिनेत्री आपलं स्पष्ट मांडत असते. नुकतीच तिने अमृता राव यांच्या ‘अमृता फिल्म्स’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी मानसीने अनेक विषयांवर आपलं मत मांडलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“अलीकडच्या अनेक मुली मूलबाळ नको असं सांगतात यावर एक नव्या पिढीतील अभिनेत्री म्हणून तुझं काय मत आहे?” असा प्रश्न अमृता यांनी मानसी नाईकला विचारला. यावर अभिनेत्री म्हणाली, “अनेकदा मला वाटतं मी फार वेगळ्या काळात जन्म घेतलाय कारण, याबाबतीत माझे विचार खूप वेगळे आहेत. मी आताच्या काळातील असली तरीही अनेक गोष्टी माझ्या ठरलेल्या आहेत. मला अशा-अशा पद्धतीने माझं आयुष्य जगायचंय हे मी आई-बाबांना फार आधीच सांगितलंय. मला वाईट याचं वाटतं की, असे निर्णय घेताना आपण कधीच आपल्या आई-वडिलांचा विचार करत नाही. खरंतर मूल होण्याचा प्रवास फक्त आपण आई-बाबा होणं यापुरता मर्यादित नसतो. याउलट आपले आई-बाबा आजी-आजोबा होणार हा गोडवा खूप मोठा असतो. फक्त त्यांचा आनंद पाहण्यासाठी तरी मला नक्कीच आई व्हायचंय.”

हेही वाचा : लग्नानंतर परदेशात स्थायिक झाली ‘मन उधाण वाऱ्याचे’ फेम अभिनेत्री; ऑस्ट्रेलियात पतीबरोबर केलं होळी सेलिब्रेशन, फोटो व्हायरल

मानसी पुढे म्हणाली, “आई होणं ही जगातली सर्वात सुंदर गोष्ट आहे. आई झाल्यावर एखादी स्त्री खऱ्या अर्थाने पूर्णत्वाला येते. आजकालच्या काळात वय जास्त झालं की, प्रत्येक बाईपुढे विविध समस्या, प्रश्न निर्माण होतात. लग्न कधी होणार वगैरे असे सगळे प्रश्न विचारले जातात. माझ्या बाबतीत सांगायचं झालं, तर मला मूल हवंय आणि माझे विचार मी आई-बाबांना सांगितले आहेत. आजकालच्या काळात विज्ञान खूप पुढे गेलं आहे. आपण डॉक्टरांशी बोलून या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करू शकतो. पण, आताच्या पिढीवर सोशल मीडियाचा खूप प्रभाव आहे.”

हेही वाचा : वंदना गुप्तेंच्या वडिलांनी लता मंगेशकरांना दिलेली उर्दू भाषेची शिकवण; आठवण सांगत म्हणाल्या, “माझी आई अन् लतादीदी…”

“काही जणांना गरोदरपणानंतर फिगर बदलेल याची काळजी असते, ती फिगर व्यवस्थित ठेवायची असते म्हणून नकार दिला जातो. काहीजण बाळाचं संगोपन करता नाही येणार असं म्हणतात, यापुढे जाऊन अनेकांना सु-शी साफ करणं घाण वाटतं. पण, माझे विचार फार वेगळे आहेत. आजी-आजोबा, सासू-सासरे, नणंद-भावजय मला ही सगळी नाती जपायला भयंकर आवडतं. मला उपजतच या सगळ्या गोष्टी करायला आवडतात. मी नात्यांना जिथे महत्त्व दिलं जातं अशा घरात जन्माला आली आहे. पैसा आज आहे अन् उद्या नसतो. पण, नाती महत्त्वाची असतात आणि हे सगळं मला माझ्या पालकांनी शिकवलं आहे.” असं मानसी नाईकने सांगितलं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manasi naik shares her opinion on current generation and motherhood sva 00