‘धर्मवीर २’ हा मराठी चित्रपट २७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपट ९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता, पण त्यावेळी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. पूरपरिस्थितीमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. अखेर चित्रपट प्रदर्शित होतोय. या चित्रपटाच्या निमित्ताने निर्माते मंगेश देसाई यांनी आनंद दिघेंचा एक किस्सा सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी निर्माते मंगेश देसाई यांची ‘बोल भिडू’ या यूट्यूब चॅनेलसाठी मुलाखत घेतली. या मुलाखतीत निर्मिती सावंत यांनी ‘धर्मवीर २’मध्ये गुवाहाटीला काय चर्चा झाली, असं सगळं असणार आहे का, असा प्रश्न विचारला. त्यावर बोलताना मंगेश देसाईंनी म्हटले, “नाही. सिनेमा बघितल्यानंतर सगळ्यांचे दृष्टिकोन बदलणार आहेत. धर्मवीर आनंद दिघेसाहेबांची राहिलेली गोष्ट ही ‘धर्मवीर २’ मध्ये आहे.” त्यावर निर्मिती सावंत यांनी म्हटले, “अरे, तूच सांगितलंस ना, तुझ्या वाक्यामुळे खरं तर तू ते बीज पेरलं आहेस. ते वाक्य काय होतं?” मग मंगेश देसाईंनी ते वाक्य म्हणून दाखवले. त्यांनी म्हटले, “इतक्या वाजता ठीक होते आणि अचानक काय झालं?” त्यानंतर मंगेश देसाईंनी, “अचानक काय झालं हे तुम्हाला चित्रपटात बघायला मिळेल की नाही हे ‘धर्मवीर २’ बघितल्यानंतरच कळणार आहे”, असे म्हटले.

पण तो आम्हाला करता आला नाही – मंगेश देसाई

मंगेश देसाई पुढे म्हणतात, “पहिला भाग जेव्हा आम्ही केला, तो साडेचार तासांचा झाला. आणखी इतके प्रसंग आहेत की, ते चित्रपटात दाखवायचे राहिले आहेत. एक प्रसंग सांगतो, इतका इंटरेस्टिंग किस्सा आहे. आता कसा दाखवायचा हे चाललं होतं; पण ते नॅरेशनमध्ये बसतं नव्हतं. साहेबांना भेटायला एक अत्यंत सुंदर स्त्री यायची. साहेबांच्या रूममध्ये जायची. साहेब त्या महिलेशी गप्पा मारत आहेत हे सगळे बघत असायचे. काय बोलतात काहीच माहीत नाही. ती साहेबांना नमस्कार करायची आणि निघून जायची. उत्सुकता म्हणून सगळ्यांनी चौकशी करायला सुरुवात केली की, ही महिला आहे तरी कोण? आणि साहेबांना महिन्यातून एकदा येऊन का भेटते? शोधाशोध झाल्यावर लक्षात आलं की, ही महिला एका लेडीज बारमध्ये काम करणारी आहे. लेडीज बारमध्ये काम करणारी बाई साहेबांना का भेटायला येते? ती साहेबांना हे सांगायला यायची की, तिथे कोण कोण गँगस्टर येतात, ते काय काय चर्चा करतात, यासंबंधीच्या त्यांच्या चर्चेतून ठाण्याला, तेथील लोकांना काही इजा आहे का? हे समजायचे. ती त्यांची खबरी होती. हा इंटरेस्टिंग सीन होऊ शकतो; पण तो आम्हाला करता आला नाही.”

हेही वाचा: अखेर कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ला सेन्सॉर बोर्डाचा हिरवा कंदील, काही दृष्ये कापण्याची सूचना

दरम्यान, ‘धर्मवीर २’ हा चित्रपट २७ सप्टेंबर २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसाद ओक हा आनंद दिघेंच्या आणि क्षितीश दाते हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रवीण तरडेंनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mangesh desai reveals anand dighe story woman worked in the ladies bar used to come to meet him says producer of dharamveer 2 nsp