गेले काही दिवस गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. सर्वजण अगदी जल्लोषात गणपती साजरे आहेत. याबरोबरच सगळेच एकमेकांच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला जात आहेत. काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी मनोरंजन सृष्टीतील सर्व कलाकारांना त्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आमंत्रित केलं होतं. त्याबद्दल आता अभिनेते मंगेश देसाई यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
यंदाच्या गणेशोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घ्यायला आतापर्यंत अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. सलमान खान, शाहरुख खान, रितेश, जिनिलीया देशमुख, जॅकी श्रॉफ, पंकज त्रिपाठी असे अनेक आघाडीचे अभिनेते दिग्दर्शक एकनाथ शिंदे यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आले होते. तर काल त्यांनी मराठी मनोरंजन सृष्टीतील कलाकारांना दर्शनासाठी निमंत्रण दिलं होतं. त्यावेळी रोहित शेट्टी, स्वप्निल जोशी, प्राजक्ता माळी, महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील कलाकार, अमृता खानविलकर, अक्षया देवधर, हार्दिक जोशी, स्पृहा जोशी, सुकन्या मोने, श्रेया बुगडे अशा अनेक आघाडीच्या कलाकारांनी हजेरी लावली. तर यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही या सर्व कलाकारांचं छान आदरातिथ्य केलं.
मंगेश देसाई यांनी याबद्दल त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. वर्षातील काल संध्याकाळची गणपतीची आरती, कलाकारांचा उत्साह आणि आनंद, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दाखवलेली आपुलकी याची झलक दाखवत मंगेश देसाई यांनी लिहिलं, “गेल्या ६० वर्षात जो सोहळा वर्षा बंगल्यात घडला नाही तो मागच्या वर्षाप्रमाणे याही वर्षात झाला. गणेश दर्शन सोहोळा . संपूर्ण चित्रपट, मालिका, नाट्य सृष्टी वर्षा बंगल्यावर मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या निमंत्रणाचा स्वीकारकरून गणेश दर्शन आणि स्नेहभोजनाला जमली होती. एखाद्या वास्तूत येताना सकारात्मक उर्जेसह येणे आणि तशीच सकारात्मकता देऊन जाणे यापेक्षा मोठ्या शुभेच्छा कुठल्याच नाहीत.”
पुढे ते म्हणाले, “मा. मुख्यमंत्री सगळ्यांना भेटून विचारपूस करत होते, खासदार श्रीकांतजी प्रत्येकाला भेटून मनसोक्त गप्पा मारत होते. हे केवळ सामन्यांची जाणीव आणि कलावंतांवर प्रेम असेल तरच शक्य आहे. मलाही आरतीचा लाभ मिळाला .बाप्पाकडे एकच मागणं, साहेबांची प्रकृती उत्तम ठेव आणि पुढच्या वर्षात पुन्हा साहेबांचं आमंत्रण सगळ्यांना येऊ दे आणि तुझं दर्शन घडू दे.” तर आता त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत नेटकरी ही पोस्ट आवडल्याचं सांगत आहेत.