प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि मंगेश देसाई निर्मित ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट सर्वाधिक लोकप्रिय ठरला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवे विक्रमही केले होते. या चित्रपटातील आनंद दिघे यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओकनं उत्तमरीत्या सांभाळली, त्यामुळे प्रसादला सर्वोकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला. मात्र, आनंद दिघेंच्या भूमिकेसाठी पहिली पसंती प्रसाद ओक नव्हती, तर अभिनेते आणि चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई हे आनंद दिघेंची भूमिका साकारणार होते. पण, काही कारणास्तव त्यांनी या भूमिकेसाठी नकार दिला. याबाबत स्वतः मंंगेेश यांनी नुकत्याच एका मुलाखतीमधून सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे आणि पृथ्वीक प्रतापचं ‘हे’ खास नातं माहितेय? जाणून घ्या

अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांच्या युट्यूब चॅनेलवरील ‘दिल के करीब’ कार्यक्रमात मंगेश देसाई सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांना विचारलं गेलं की, ‘तुम्ही आनंद दिघेंची भूमिका का केली नाही?’ यावर मंगेश देसाई म्हणाले की, “माझ्या स्क्रीनटेस्ट झाल्या. २०१४, २०१७, २०१९ या सालात स्क्रीन टेस्टबरोबर, लूक टेस्टसुद्धा केली. मी दिघे साहेबांसारखा दिसत होतो. २०२२ ला प्रवीण तरडेनं सांगितलं, ‘दिघे साहेबांची तूच भूमिका कर.’ तेव्हा मी म्हणालो, मीच दिघेसाहेबांची भूमिका करणार आहे. मग मी प्रयत्न सुरू केले.”

हेही वाचा – “…स्टार किड्स वगैरे काही नसतं”; प्रिया बेर्डेंनी सांगितला इंडस्ट्रीतला धक्कादायक अनुभव, म्हणाल्या, “अभिनयला…”

पुढे मंगेश देसाई म्हणाले की, “पण त्यावेळेस मी कुठल्याच अँगलनं दिघेसाहेबांसारखा दिसत नव्हतो. मी शिंदे साहेबांना (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) दाखवलं, ते म्हणाले, ‘नाही रे, तू दिघे साहेबांसारखा दिसत नाहीयेस.’ साहेबांचे स्वीय सहाय्यक सचिन जोशी सर म्हणून होते; तेही म्हणाले, ‘नाही, तू तसा दिसतच नाहीयेस.’ त्यानंतर आता काय करूया? असा प्रश्न निर्माण झाला होता. प्रवीण म्हणाला, ‘तू कर, तू उलट मारून नेशील रे, उन्नीस बीस चालतं.’ मी शांतपणे राहून विचार केला; उद्या जर चित्रपट प्रदर्शित झाला आणि म्हणाले, अप्रतिम चित्रपट होता. प्रवीणने उत्तम काम केलं. चित्रपट छान होता, पण दिघे साहेबांसारखा मंगेश दिसला नाही. थोडसं दुसऱ्याला कोणाला तरी निवडायला पाहिजे होतं.”

हेही वाचा – “…म्हणून मी भाजपामध्ये प्रवेश केला”; प्रिया बेर्डेंनी सांगितलं राष्ट्रवादी सोडण्याचं कारण; म्हणाल्या, “मी घुसमट…”

“मी मनात म्हटलं, २०१३ पासूनचा माझा सगळा प्रयत्न फसेल. कुठल्याही पद्धतीनं त्या चित्रपटाला गालबोट लागायला नको. मी दुसऱ्या दिवशी आलो आणि प्रवीणला म्हटलं, मी नाही करत. प्रवीण म्हणाला, ‘तू वेडा आहेस, तू कर, असा काय करतो?’ मी म्हटलं, मी नाही करत, आपण नवा नट शोधू या आणि मग पुन्हा दिघे साहेबांच्या भूमिकेसाठी नटाच्या शोधाची सुरुवात झाली. तोपर्यंत चित्रपटाचं शेड्यूल लागलं होतं. स्टारकास्ट ठरली होती. सगळं झालं होतं. लोकेशन ठरली होती. लोकेशनवर सेट बांधायला घेतला होता, पण दिघेसाहेबांच्या भूमिकेसाठी कोणी मिळाले नव्हते. मग प्रसादची निवड झाली,” असं मंगेश देसाई म्हणाले.

हेही वाचा – अभिनेता सुयश टिळक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस; ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकला

दरम्यान, धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वीच ‘धर्मवीर २: मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट… अशी टॅगलाईन त्या पोस्टरवर होती.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mangesh desai was to play the role of anand dighe in dharmaveer movie not prasad oak pps