लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओक दिग्दर्शित सुशीला सुजीत हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १० एप्रिल २०२५ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओकने केले आहे. तसेच या चित्रपटाची निर्मितीची जबाबदारी प्रसाद ओकसह पत्नी मंजिरी ओक(Manjiri Oak)ने सांभाळली आहे. मंजिरी ओक अनेकदा चर्चेत असते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट बऱ्याचदा चर्चांचा विषय ठरतात. याबरोबरच, विविध मुद्द्यांवर मंजिरी ओक तिचे मत स्पष्टपणे मांडताना दिसते. मंजिरी ओक ही उद्योजिका आहे. एका मुलाखतीत मंजिरी ओकने ती उद्योजिका का व कशी झाली, याबद्दल खुलासा केला आहे.

मंजिरी ओक उद्योजिका कशी बनली?

काही दिवसांपूर्वी मंजिरी ओकने लोकशाही फ्रेंडलीला मुलाखत दिली. या मुलाखतीत मंजिरी ओक म्हणाली, “जेव्हा मला असं वाटतं की मी छान दिसलं पाहिजे, त्याच्यासाठी मी दागिना आणि ड्रेस घेऊन आले आणि मला असं वाटलं की हे छान आहे, यातून मला हळूहळू असं वाटू लागलं की मी घरी आहे तर मी दागिन्यांचं काम करू शकते. मग मी त्यावर खूप विचार केला. मी हे कसं करू शकते, कोणापर्यंत पोहोचू शकते याचा विचार केला. असं करत करत माझ्याकडे आता जयपूरचे चार-पाच कारागीर आहेत. मी काम सुरू केलं तेव्हा एक कारागीर होता. शुद्ध चांदीच्या दागिन्यांचे ते डिझायनिंग करतात. काही डिझाईन माझे असतात, काही त्यांचे असतात.”

पुढे हे तू कुठे शिकलीस असे विचारले, त्यावर बोलताना मंजिरी ओक म्हणाली, “मी कुठे शिकली नाही, मी घरी होते आणि मी घरातून हे सुरू केलं. मला सुचलेलं डिझाईन मी कारागीरांपर्यंत पोहोचवते. ते तो दागिना घडवतात. त्याची आवड आहे. मुळात मला नटायला खूप आवडतं, त्यामुळे कॉस्ट्युम डिझाईनिंग वैगेरे सुरू झाले.”

दरम्यान, आता मंजिरी ओक चित्रपट निर्मितीची धुरा सांभाळताना दिसत आहे. सुशीला सुजीत या चित्रपटाच्या निर्मितीत मंजिरी ओकसह प्रसाद ओक व अभिनेता स्वप्नील जोशीदेखील सहभागी आहेत. या चित्रपटातील चिऊताई चिऊताई दार उघड हे गाणे काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या गाण्यात अमृता खानविलकर आणि गश्मीर महाजनी प्रमुख भूमिकेत दिसले होते. त्यांच्या या गाण्याने धुमाकूळ घातला होता. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी हे चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.