मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून प्रसाद ओकला ओळखले जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रसादने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्याबरोबरच प्रसाद एक उत्तम दिग्दर्शकही आहे. प्रसादप्रमाणेच त्याची पत्नी मंजिरीही तितकीच चर्चेत असते. प्रसाद व मंजिरी सोशल मीडियावर निरनिराळे व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना अपडेट देत असतात.
नुकतेच मंजिरी ओकने ‘आसोवा’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने प्रसादबरोबरचा एक किस्सा सांगितला आहे. मंजिरी म्हणाली, “हिरकणी चित्रपटाच्या शूटिंगचा तिसऱा दिवस सुरू होता. एका सीनमध्ये सोनाली गरोदर असते आणि ती एका कठड्यावर बसलेली दाखवण्यात आलं होतं. एक बाई येते आणि ती आपल्या हातातल्या कळशीतील पाणी सोनालीला प्यायला देते एवढाच शॉर्ट होता. त्यावेळेस रणरणतं ऊन होतं. सोनालीने जी साडी नेसली होती त्या साडीचा कोरडा रंगही हाताला लागत होता. शूटिंगदरम्यान ती बाई सोनालीच्या हातावर पाणी ओतत होती आणि त्यातील दोन थेंब साडीवर सांडले. माझ्या डोक्यात लगेच विचार आला, आता ओला रंगही लागणार आणि याच विचारात मी चालू शूटिंगमध्ये ए माझी साडी असं जोरात ओरडले.”
मंजिरी पुढे म्हणाली, “चालू शूटिंगमध्ये माझे ओरडणे ऐकून प्रसाद खूप भडकला. सेटवर सगळ्यांसमोर तो मला इतका ओरडला की, पुढचे दोन तास अख्ख्या युनिटमध्ये कुणीच आवाज केला नाही आणि सगळे सीन पटापट शूट झाले. प्रसादच्या या ओरडण्याने मला खूप वाईट वाटलं होतं. गडावर ताक व दही विकणाऱ्या ज्या झोपड्या असतात, त्या झोपड्यांच्या मागे जाऊन मी ढसाढसा रडत होते. शेवटी सोनालीने तिकडे येऊन माझी समजूत काढली होती.”
मंजिरी व प्रसादने ७ जानेवारी १९९८ साली लग्नगाठ बांधली. नुकताच त्यांनी लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा केला. प्रसाद व मंजिरीला सार्थक, मयंक अशी दोन मुले आहेत. प्रसादच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात मंजिरीने त्याला खूप साथ दिली. अनेक मुलाखतींमध्ये प्रसादने कठीण काळात पत्नीची कशी साथ लाभली, याबाबत भाष्य केले आहे.