अभिनेता प्रसाद ओक हा त्याच्या अभिनयाने आणि आता दिग्दर्शनाने प्रेक्षकांना कायमच भुरळ घालत आला आहे. त्याने आतापर्यंत का केलेल्या सगळ्याच कामाचं प्रेक्षकांकडून खूप कौतुक केलं गेलं. त्याच्या या संपूर्ण प्रवासात त्याला त्याची पत्नी मंजिरी ओक हिची मोलाची साथ लाभली आहे. ते दोघेही एकमेकांबद्दल सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. आता मंजिरीने प्रसादसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये तिने प्रसादच्या आतापर्यंतच्या सर्व कलाकृतींची नावं गुंफून त्यांचं सहजीवन कसं आहे हे सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज प्रसाद आणि मंजिरी यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. यानिमित्त मंजिरीने तिचे आणि प्रसादचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. फोटो पोस्ट करत तिने लिहिलं, “प्रिय प्रसाद…९३ साली आपली खऱ्या अर्थानी ‘प्रेमाची गोष्ट’ सुरू झाली. अर्थात त्याआधी तू मला बराच काळ ‘अधांतर’ ठेवलं होतंस. आणि त्यामुळे आपल्यामधे काही दिवस ‘रणांगण’ तापलं होतं…पण हळूहळू ‘अशी बायको हवी’ म्हणत तू ‘एकदा पहाव करून’ असंही म्हणालास आणि आपण लग्न करु का नाही असं वाटणाऱ्या लोकांचा ‘भ्रमाचा भोपळा’ फोडलास आणि शेवटी ही ‘साहेबजी डार्लिंग’ झालेच आणि ‘धन धना धन’ असा आपला संसार सुरू झाला. तो चालू असताना तुला अनेकदा मला मनवताना ‘बोल बेबी बोल’ म्हणावं लागलं आणि मला पटवावं लागलं की खरंच ‘मी बबन प्रामाणिक’ आहे.”

आणखी वाचा : Video: …अन् सारा अली खान रितेश देशमुखशी चक्क मराठीत भांडू लागली, व्हिडीओ व्हायरल

पुढे ती म्हणाली, “पण तुला लवकरच कळलं की मीच या घराची ‘सूत्रधार द बॉस’ आहे. अर्थात्त तुला ती संधी मी ‘आलटून पालटून’ देत होते . ह्यालाच म्हणत असतील का सुखी संसाराची ‘नांदी’??? आपला पुण्याचा ‘वाडा चिरेबंदी’ सोडून आज २५ वर्ष झाली . पण तुझ्या बरोबरच्या अनेक सुख दुःखाची ही ‘बेचकी’ तोडून आज ही मी तुझ्या बरोबर एका ‘मग्न तळ्याकाठी’च बसलीय असंच वाटतं . त्यामुळे पुढची २५ वर्ष एकमेकांना ‘तू म्हणशील तसं’ म्हणतच राहुयात.”

हेही वाचा : Video : “माझं काही चुकलं का?” प्रसाद ओकने ‘तो’ व्हिडीओ शेअर करत विचारला प्रश्न

मंजिरीच्या या खास पोस्टवर प्रसादनेही आकर्षक कमेंट लिहीत तिच्याबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे. त्याने लिहिलं, “तूच होतीस ‘कच्चा लिंबू’, तूच झालीस आपल्या मुलांची ‘हिरकणी’, तूच आहेस माझी ‘चंद्रमुखी’, असंच आनंदात जगू ‘हाय काय नाय काय.'” मंजिरीने प्रसादसाठी केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टवर कमेंट करत त्यांचे मित्रमंडळी आणि चाहते त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manjiri oak wrote a special post for prasad oak rnv