दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘फादर्स डे’ म्हणजे पितृदिन साजरा केला जात आहे. प्रत्येकजण सोशल मीडियाद्वारे आपल्या वडिलांविषयी कृतज्ञता, प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. मराठी कलाकार आपल्या वडिलांबरोबर फोटो, व्हिडीओ शेअर करून भरभरून लिहिताना पाहायला मिळत आहेत. अशातच लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओकने लिहिलेल्या सुंदर पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. कामाव्यतिरिक्त मजेशीर व्हिडीओ शेअर करत असते. एवढंच नव्हे तर आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींविषयी परखड मत मांडत असते. आज ‘फादर्स डे’निमित्ताने मंजिरीने खूप छान पोस्ट लिहिली आहे. जुन्या आठवणींना उजाळा देत तिनं ही पोस्ट लिहिली आहे.
हेही वाचा – Video: ‘अप्पी आमची कलेक्टर’मधील सिंबाने ‘फादर्स डे’ निमित्ताने अर्जुनला दिलं गोड सरप्राइज, व्हिडीओ व्हायरल
एक व्हिडीओ शेअर करत मंजिरीने लिहिलं आहे, “प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, असं म्हणतात ना ? (किती टिपीकल वाक्य आहे )…पण एका यशस्वी आईच्या मागे एक ‘मधे मधे न येणारा’ बाबा असतो…तू ‘तो’ बाबा आहेस प्रसाद… २/३ वर्षातून एकदाच पालक मिटिंगला जाऊन…मुलांच्या तक्रारी ऐकल्यानंतर…तिथून येताना मुलांना कबुतरांना दाणे खायला घालणारा बाबा आहेस तू…’बाबाला विचारून सांगते’ असं माझ्या तोंडून ऐकल्यावर त्यावर भाबडे पणानी विश्वास ठेवणारा बाबा आहेस तू…अचानक ‘अभ्यासाविषयी चौकशी करणारा’ आणि त्यावर ‘स्वतःच हसणारा’ बाबा आहेस तू…घरात मंजूचं बॉस आहे हे आपल्या आयुष्याच्या पहिल्या क्षणापासून स्वीकार करणारा बाबा आहेस तू…”
“अचानक कधीही मुलांना ‘ठीक आहेस ना’ असं विचारणारा बाबा आहेस तू…मुलांच्या वेगवेगळ्या वयात तुझ्या ‘त्याच वयात’ राहिलेला बाबा आहेस तू…लहानपणी मुलांना आणलेली खेळणी त्यांच्याशीच भांडून खेळणारा बाबा आहेस तू…आणि मोठे झाल्यावर त्यांचे नवे ‘शूज’ त्यांना न सांगता हळूच घालून जाणारा बाबा आहेस तू… थोडक्यात काय , एका ‘गुणी आईच्या मुलांचा’ बाबा आहेस तू…मुलं आणि मस्कारा पण मोठी झाली प्रसाद…तू कधी होणार? पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांच्या डोळ्यात ज्याच्याविषयी अत्यंत आदर आणि प्रेम असणारा बाबा आहेस तू…अरे हॅप्पी फादर्स डे,” अशा अनोख्या अंदाजात मंजिरीने फादर्स डेच्या शुभेच्छा प्रसाद ओकला दिल्या आहेत.
मंजिरी ओकच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “किती गोड”, “क्या बात है”, “मुलांची खेळणी त्यांच्याशीच भांडून खेळणारा बाबा आहेस भारी”, अशा प्रतिक्रिया तिच्या पोस्टवर उमटल्या आहेत.