महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘काकस्पर्श’ चित्रपट चांगलाच गाजला होता. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. उत्तम दिग्दर्शन, उत्तम कथानक आणि कलाकारांचा उत्तम अभिनय याची सांगड उत्कृष्टरित्या झाल्याने ‘काकस्पर्श’ ब्लॉकबस्टर ठरला होता. याच ब्लॉकबस्टर चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांना न घेण्याचा सल्ला अनेकांनी महेश मांजरेकरांना दिला होता. याचा खुलासा अभिनेत्रीने एका मुलाखतीमधून केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वी सविता मालपेकर यांनी ‘अमृता फिल्म’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी मनोरंजनसृष्टीतील सुरुवात आणि त्यांना कशाप्रकारे अनेकांनी त्रास दिला याविषयी सांगितलं. तेव्हा त्यांनी ‘काकस्पर्श’ चित्रपटादरम्यान किस्सा सांगत हा खुलासा केला. सविता मालपेकर म्हणाल्या, “इंडस्ट्रीत वर्चस्व गाजवण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. ‘काकस्पर्श’ चित्रपटाच्या वेळी काय घडलं सांगते. ‘काकस्पर्श’मध्ये महेश मांजरेकरांनी मला घेतल्यानंतर त्यांना किती जणांनी सांगितलं होतं की, सविता मालेपकरांना घेऊ नकोस. पण महेश मांजरेकर एक दिग्दर्शक म्हणून, एक अभिनेता म्हणून इतका हुशार आणि विद्वान माणूस आहे. त्याला माहिती होतं. एक विश्वास होता.”

हेही वाचा – छगन भुजबळांच्या पहिल्या सिनेमातून सविता मालपेकरांना काढलं होतं, किस्सा सांगत म्हणाल्या, “रंजना…”

पुढे सविता मालपेकर म्हणाल्या, “जेव्हा महेश मांजरेकर सारखी व्यक्ती सविता मालपेकरांना सांगते टक्कल कर, याच्या पाठीमागे काहीतरी असणार की नाही? मी त्याच्यावर विश्वास ठेवला. जेव्हा समोरची व्यक्ती विचारते याचा अर्थ त्याच्यात काहीतरी असणार. त्या दिग्दर्शकाला वाटलं असणार सविता मालपेकर करू शकेल आणि ते पोहोचवू शकेल. तेव्हाच त्यांनी मला विचारलं की नाही. पण त्याला जाऊन किती जणांनी सांगितलं होतं. एक पुरुष कलाकार जो स्वतःला उत्तम अभिनेता समजतो, कोकणातलाच आहे, त्याने जाऊन सांगितलं, ‘अरे तिच काय? सविता मालपेकर स्वर…’ सविता मालपेकर स्वर काय असतो? माझं आडनाव मालपेकर आहे. हा, गावाकडचा सूर, स्वर हे मान्य करेन. पण मालपेकर स्वर कसा काय असू शकतो? पण त्याच्यानंतर जेव्हा माझं काम बघितलं, तेव्हा येऊन त्या कलाकाराने सॉरी म्हटलं. ‘आमच्या डोक्यात असं होतं ना, म्हणून आम्ही महेशला तसं सांगितलं, शिडशिडीत बांधा वगैरे.’ तुम्ही कोण ठरवणारे? जो बाप माणूस बसला आहे, जो करोडो रुपये त्या सिनेमासाठी खर्च करणार आहे, त्या माणसाला माहितेय कुठल्या भूमिकेसाठी कोण योग्य आहे. तुम्ही काय सांगताय?”

“हे जे आपल्या इंडस्ट्रीत आहे ना. त्यामुळे मला सतत असं वाटतं राहत इतकं कामाच्या बाबतीत असुरक्षित का आहेत? ही जी माणसं एखाद्याबद्दल अशाप्रकारे बोलतात ना, तेव्हा ती असुरक्षित असतात. त्यांना सतत भीती वाटतं असते. माझं म्हणणं आहे, तुमच्यावर तुमचा विश्वास का नाहीये? असं कधीच तुमच्या मनात आलं नाही की, आपण या कलाकाराबद्दल चांगलं बोलू या. कशाला त्याला घेताय? तो काही चांगलं काम करणार नाही? हे सगळं कशासाठी करता?,” असा प्रश्न सविता यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – सविता मालपेकरांनी पहिल्यांदा दारुच्या ग्लासला हात लावला अन् त्यांना पाहून अशोक सराफ म्हणालेले…

दरम्यान, ‘काकस्पर्श’ चित्रपटात सविता मालपेकर यांनी नमू आत्याची भूमिका म्हणजेच हरीची विधवा काकू साकारली होती. त्यांची ही भूमिका चांगलीच गाजली होती. तसंच या चित्रपटातील सविता मालपेकरांच्या कामाचं खूप कौतुक झालं होतं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Many advice mahesh manjrekar not to cast savita malpekar in kaksparsh marathi movie pps