गेल्या काही दिवसांपासून ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ऐतिहासिक चित्रपटाची सातत्याने चर्चा सुरु आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजाच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे. या चित्रपटातील कलाकारांवर अनेक राजकीय नेत्यांकडून आक्षेप घेतला जात आहे. नुकतंच मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आस्ताद काळे याने यावर स्पष्टपणे मत मांडले होते. यात त्याने प्रेक्षकांना मारहाण केल्याच्या मुद्द्यावर स्पष्टपणे मत मांडलं होतं. मात्र यावरुन आता त्याला ट्रोल केले जात आहे.
आस्ताद काळे हा नेहमी त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. तो अनेकदा विविध मुद्द्यांवर भाष्य करत त्याचे स्पष्ट मत मांडताना दिसतो. नुकतंच फेसबुकवर ‘हर हर महादेव’ या चित्रपटाबद्दल पोस्ट शेअर केली होती.
आणखी वाचा : “हर हर महादेव बघायला जाताना भीती…” आस्ताद काळेची ‘ती’ पोस्ट चर्चेत
“कुठलाही चित्रपट किंवा नाटक, पदरचे पैसे(प्रामाणिक कमाईचे) खर्च करून बघायला गेलेल्या सामान्य प्रेक्षकाला धमकावणं, मारहाण करणं हे कसलं लक्षण मानावं? या कृत्यातून काय साध्य झालं असं मानायचं? आम्ही काय बघावं, अथवा बघू नये, हे ठरवायला आधीच सेन्सर बोर्ड बसवलेलं आहे. त्यात आता या भीतीची भर??!! मी “हर हर महादेव” पाहिला नाहीये.
त्यामुळे मी चित्रपटाबद्दल काही बोलणार नाही. पण तो बघायला जाताना अशी भीती बाळगून जायचं असेल तर अवघड आहे!!!! “आपल्याच मुलुखातील रयत आपल्याच मुलुखात दहशतीखाली राहते आहे, हे फार फार अनुचित आहे” हे छत्रपती शिवरायांना बोचणारं शल्य होतं. ता.क:- ते प्रेक्षक हेच मतदारही आहेत”, असे आस्ताद काळेने म्हटले होते.
आणखी वाचा : प्रेम, लग्न, घटस्फोट; ‘बिग बॉस’मुळे चर्चेत असलेल्या अपूर्वा नेमळेकरच्या खासगी आयुष्याबद्दल माहितीये का?
आस्तादच्या या पोस्टवर एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे. त्यात त्याने संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाबद्दल उल्लेख केला आहे. ‘बाजीराव मस्तानीमध्ये जेव्हा काशीबाई नाचली तेव्हा जे घडलं त्याबद्दल आपले मत काय?’ असा प्रश्न एका नेटकऱ्याने उपस्थित केला आहे. त्यावर आस्ताद काळेने स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे. “ते मी तेव्हा जाहीरपणे व्यक्त केलं होतं. अतिशय संतापजनकच प्रकार होता तो”, असे त्याने यावर उत्तर दिले आहे.
दरम्यान दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटातील पिंगा गाण्यावरुन बराच वाद निर्माण झाला होता. हे इतिहासाला धरून नसल्याने त्याविरोधात संतापाची लाट निर्माण झाली होती. तसेच या चित्रपटातील काही दृश्यांनीही विरोध झाला होता.