गेल्या काही दिवसांपासून हर हर महादेव आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ऐतिहासिक चित्रपटाची सातत्याने चर्चा सुरु आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजाच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे. या चित्रपटातील कलाकारांवर अनेक राजकीय नेत्यांकडून आक्षेप घेतला जात आहे. नुकतंच मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आस्ताद काळे याने यावर स्पष्टपणे मत मांडले आहे. त्याने फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे.
आस्ताद काळे हा नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. तो नेहमी त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. तो अनेकदा विविध मुद्द्यांवर भाष्य करत त्याचे स्पष्ट मत मांडताना दिसतो. नुकतंच आस्ताद काळेने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे तो चर्चेत आला आहे.
आस्ताद काळेची पोस्ट
“कुठलाही चित्रपट किंवा नाटक, पदरचे पैसे(प्रामाणिक कमाईचे) खर्च करून बघायला गेलेल्या सामान्य प्रेक्षकाला धमकावणं, मारहाण करणं हे कसलं लक्षण मानावं? या कृत्यातून काय साध्य झालं असं मानायचं?
आम्ही काय बघावं, अथवा बघू नये, हे ठरवायला आधीच सेन्सर बोर्ड बसवलेलं आहे. त्यात आता या भीतीची भर??!!
मी “हर हर महादेव” पाहिला नाहीये. त्यामुळे मी चित्रपटाबद्दल काही बोलणार नाही.
पण तो बघायला जाताना अशी भीती बाळगून जायचं असेल तर अवघड आहे!!!!
“आपल्याच मुलुखातील रयत आपल्याच मुलुखात दहशतीखाली राहते आहे, हे फार फार अनुचित आहे” हे छत्रपती शिवरायांना बोचणारं शल्य होतं.
ता.क:- ते प्रेक्षक हेच मतदारही आहेत”, असे आस्ताद काळेने म्हटले आहे.
दरम्यान माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटांना विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हेदेखील आक्रमक झाले आहेत. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. याच कारणामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्ह्यातील एका मॉलमधील हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला. राष्ट्रवादीने प्रेक्षकांना सिनेमागृहात बाहेर जाण्याचे आवाहन केले. त्यानंतरही सिनेमागृहात बसून असलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावल्याने किरकोळ वादाचे प्रसंगही घडले. त्यात एका प्रेक्षकाला मारहाणही झाल्याचे समोर आले होते.