भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान ३’ ने यशस्वी प्रक्षेपण केले. आज (१४ जुलै) दुपारी २.३५ मिनिटांनी चंद्रायानाचे आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण करण्यात आले. २३ ऑगस्ट रोजी हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल, असे बोललं जात आहे. चांद्रयान ३ ने यशस्वी प्रक्षेपण केल्यानंतर अनेक कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
चांद्रयान ३ ने यशस्वी प्रक्षेपण केल्यानंतर सिनेसृष्टीतून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. तसेच सोशल मीडियावरही ‘चांद्रयान-३’ मोहिमेला शुभेच्छा देणारे अन् इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक करणारे पोस्ट, मेसेजेस, व्हिडीओ व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत.
आणखी वाचा : Chandrayaan 3 Launch Live: चांद्रयान ३ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पंतप्रधान मोदींनी केलं ISRO च्या वैज्ञानिकांचं अभिनंदन; म्हणाले…
अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्यात तिने “मला भारताचा अभिमान वाटतो”, असे म्हटले आहे. तर अभिनेता चिन्मय मांडलेकरने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे. “चांद्रयान ३ ने यशस्वी प्रक्षेपण केले आहे. इस्रोचे शास्त्रज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञ यांचा मला खूप अभिमान वाटतो. जय भारत. वंदे मातरम”, अशी पोस्ट चिन्मय मांडलेकरने केली आहे.
तर अभिनेत्री शिवानी बावकरने चांद्रयान ३ च्या यशस्वी प्रक्षेपणाचा फोटो पोस्ट केला आहे. त्याबरोबर तिने “भारताचे अभिनंदन”, असे म्हटले आहे.
यशस्वी डबिंग आर्टिस्ट आणि अभिनेत्री मेघना एरंडेनेही यानिमित्ताने पोस्ट शेअर केली आहे. “भारतासाठी अभिमानाचा क्षण, चांद्रयान ३ . मेरा भारत महान”, असे तिने कॅप्शन देताना म्हटले आहे.
आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात साधनाच्या सूनेची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोण? जाणून घ्या
‘चांद्रयान- ३’ नेमकं काय आहे?
चांद्रयान-३ हे चांद्रयान-२ चा फॉलो-अप मिशन आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडरचे सॉफ्ट लँडिंग करणे हा त्याचा उद्देश आहे. चांद्रयान-२ मध्ये विक्रम लँडरचे क्रॅश लँडिंग झाले होते. त्याचे अवशेष अमेरिकन अंतराळ संस्थेला तीन महिन्यांनंतर सापडले. यानंतर चार वर्षांनंतर इस्रो ‘चांद्रयान-३’ च्या माध्यमातून पुन्हा लँडर आणि रोव्हर दक्षिण ध्रुवावर लँड करण्याचा प्रयत्न करणार आहे. यातील रोव्हर हा एक सहा चाकी रोबोट आहे, जो लँडरच्या आत असेल, तो लँडिंगनंतर बाहेर येईल.