गेल्या काही वर्षांपासून सिनेसृष्टीत स्टार किड्स ही संकल्पना चांगलीच चर्चेत आहे. याच स्टार किड्सच्या यादीतील एक अभिनेता म्हणजे आदिनाथ कोठारे. तो कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. नुकतंच आदिनाथने स्टार किड्स आणि स्ट्रगल याबद्दल भाष्य केले आहे.
आदिनाथ कोठारेने नुकतंच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला स्टार किड्सबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी त्याने “कोठारे आडनावामुळे लोक फक्त हाय-हॅलो करतील, पण पैसे लावत नाहीत”, असे स्पष्ट वक्तव्य केले.
आणखी वाचा : “लक्ष्या काकांचा तो वारसा मी चालवला”, आदिनाथ कोठारेने सांगितली खास आठवण, म्हणाला “ते सेटवर आले की…”
आदिनाथ कोठारे काय म्हणाला?
“‘पाणी’ या चित्रपटाचा पहिला ड्राफ्ट सुरु झाला. त्यानंतर मग त्यासाठी निर्माता शोधण्याचा प्रवास सुरु झाला. लोकांना वाटेल की स्टार किड्स असल्यामुळे आदिनाथला चित्रपट बनवणं फार सोप्प असेल. पण मला पाणी चित्रपटासाठी निर्माता शोधायला दोन वर्षे लागली. २०१६ मध्ये आमच्या चित्रपटाचा पहिला ड्राफ्ट पूर्ण झाला. २०१६ चे काही महिने आणि २०१७ या वर्षात आम्ही निर्माते शोधत होतो.
काही स्टुडिओने मला बोलवलं. त्यांना स्क्रिप्ट आवडलं. चार पाच रिडींग झालं. पण जेव्हा पैसे गुंतवण्याची वेळ आली, तेव्हा सर्वांना असं वाटलं की तू आधी चित्रपट बनवं, मग आम्ही त्यात गुंतवणूक करतो. कारण मी नवीन दिग्दर्शक होतो.
कोठारे आडनावामुळे लोक फक्त हाय-हॅलो करतील, पण जर त्यांना तुमच्यावर पैसे लावायचे असतील तर तुमचे मेरीट कामाला येतात. त्याचा मी अनुभव घेतला. मला या गोष्टी माहिती होत्याच. कोठारे आडनावामुळे मला ते मिळावं, अशी माझी अपेक्षा नव्हती. मला माझ्या हिंमतीवर हे प्रोजेक्ट करायचं होतं. मला वडिलांची कोणतीही मदत घ्यायची नव्हती. माझे वडील हे सर्व काही पाहत होते आणि त्यांनाही मी जे काही करतो ते आवडत होतं”, असे आदिनाथ कोठारेने सांगितले.
आणखी वाचा : “खरी शिवसेना कोणाची? शिंदेंची की ठाकरेंची?”; अभिजीत बिचुकले म्हणाला “शिवरायांचं नाव असेल तर…”
दरम्यान ‘पाणी’ हा आदिनाथ कोठारेने दिग्दर्शन केलेला पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटाला राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले होते. या चित्रपटात त्याने मुख्य भूमिका साकारली होती. त्याबरोबरच त्याने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते.