गेली अनेक वर्षे विविध मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे कलाकार म्हणजे अजय पुरकर. शिवराज अष्टकातील चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिकांमुळे ते घराघरात पोहोचले. काही महिन्यांपूर्वी अजय पुरकर यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. आता त्यांनी निर्मिती संस्था सुरु करण्यामागचा हेतू काय होता, याबद्दल सांगितले आहे.
अजय पुरकर यांनी ‘जमदग्नीवत्स प्रॉडक्शन्स’ या नावाची निर्मितीसंस्था स्थापन केली आहे. या संस्थेद्वारे ते नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका, ओटीटीवरील चित्रपट, मालिका यांची निर्मिती करतात. नुकतंच त्यांनी याबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : “दोन-अडीच तास…”, ‘तीन अडकून सीताराम’ चित्रपट पाहिल्यावर सुबोध भावेची प्रतिक्रिया
“‘जमदग्नीवत्स प्रॉडक्शन्स’ या निर्मितीसंस्थेच्या निर्मितीची सुरुवात झाली याचा मला आनंद आहे. पहिली निर्मिती करताना सर्व गोष्टी पारखून त्याची निवड करावी लागते. नव्या लेखकांच्या कथांची निवड केली आहे. यात मराठीसह तेलगू आणि हिंदी चित्रपटाचं चित्रीकरण केलं”, असे अजय पुरकर म्हणाले.
“नव्या लेखकांच्या गोष्टी छान आहेत आणि त्यांना दिलेल्या सूचनांनुसार आवश्यक बदल स्वीकारून त्यांच्याबरोबर काम करता येण्याचा आनंदही आहे. गणरायानं चांगलं काम करण्याचा आशीर्वाद दिला आहे. पुढच्या वर्षी तू परत येईपर्यंत अधिक चांगलं काम हातून व्हावं, हेच मागणं मी त्याच्याकडे मागितलं. मराठी लोक निर्मितीत येत नाहीत, ही तक्रार दूर करून अधिकाधिक चांगला आशय देण्यासाठी प्रयत्न करणार आहे”, असेही अजय पुरकर यांनी सांगितले.
आणखी वाचा : ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाची सुरुवात नेमकी कशी झाली? आदेश बांदेकर म्हणाले “फक्त १३ दिवसांसाठी…”
दरम्यान अजय पुरकर हे सुभेदार या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ते नरवीर तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारत आहेत. ‘सुभेदार’ हा चित्रपट ‘श्री शिवराज अष्टका’मधील हे पाचवं चित्र पुष्प आहे. यात सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, स्मिता शेवाळे, अभिजीत श्वेतचंद्र, शिवानी रांगोळे, समीर धर्माधिकारी, उमा सरदेशमुख, अर्णव पेंढारकर इत्यादी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.