मराठी सिनेसृष्टीत ‘हँडसम हंक’ म्हणून ओळखले जाणारे अजिंक्य देव सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आपल्या कामाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल पोस्ट शेअर करत असतात. नुकतीच त्यांनी वडील रमेश देव यांच्या आठवणीत सुंदर कविता सादर केली; ज्याचा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे.
२ फेब्रुवारी २०२२ रोजी रमेश देव यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. वयाच्या ९३व्या वर्षी रमेश देव यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनाच्या चार दिवसांपूर्वीच ३० जानेवारीला त्यांचा ९३वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. रमेश देव यांच्यानंतर पत्नी सीमा देव यांचं गेल्या वर्षी निधन झालं. अल्झायमर्स या आजारामुळे ८१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. दोघांच्या निधनानंतर अजिंक्य देव बऱ्याचदा आपल्या आई-वडिलांच्या आठवणीत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतात.
नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अजिंक्य देव यांनी वडिलांच्या आठवणीत भाऊसाहेब पाटणकर यांची कविता सादर केली आहे. “वाटले नव्हते कधी काळ आहे यायचा…संपले हे उद्यान आणि आहे सहारा यायचा..या वेळीसही रेतीत मी फुलबाग आहे लावली…इतुकेचही या इथे मी आज फक्त अबोली लावली…गंधही आहे इथे, आहे अबोली ही जरी…आहे स्मृतींचा गंध इथे, त्यांना जरी नसला तरी…रिझविण्या आम्हा इथेही आहेत कोणी सोबती…सोबती आहेत आसू, गतकाल आहे सोबती…, अशी कविता सादर करत अजिंक्य देव शेवटी म्हणाले की, बाबांच्या मनात कदाचित हेच विचार असतील.
अजिंक्य देव यांच्या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “खूप सुंदर कविता आणि तितकेच सुंदर सादरीकरण केलेत सर”, “खूपच सुंदर कविता आहे”, “खूप छान”, “अप्रतिम” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.
हेही वाचा – Video: तेजश्री प्रधानला बनवता येत नाही ‘हा’ पदार्थ, इम्प्रेस करण्यासाठी करावी लागेल ‘ही’ गोष्ट
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील एक सर्वोत्कृष्ट जोडी म्हणजे रमेश देव आणि सीमा देव. एकेकाळी ऑनस्क्रीन बहीण भावाची भूमिका करणारे हे दोघं नंतर खऱ्या आयुष्यातले जोडीदार झाले. या जोडीने फक्त अभिनयाने नाही, तर आपल्या प्रेमकहाणीने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. पण, आज हीच एव्हरग्रीन जोडी आपल्यात नसली तरी त्यांच्या आठवणी मात्र अविस्मरणीय राहणार आहेत.